टक्केवारीत अडकला शिवनेरीचा शिवजयंती महोत्सव

टक्केवारीत अडकला शिवनेरीचा शिवजयंती महोत्सव

शिवनेरी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने यंदा जुन्नर तालुक्यातील शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर महादुर्गोत्सवाचे आयोजन केले आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांचे 'बजेट' निश्चित केले आहे. एका खासगी एजन्सीला हा सर्व निधी देऊन जास्तीत जास्त टक्केवारी कशी मिळेल असे कार्यक्रम निश्चित करण्याचा डाव पर्यटन विभागाने आखला आहे. यामध्ये शासनाच्या निधीचा वापर करून सशुल्क टेंट सिटी, वडज व कुकडी धरण येथे वॉटर स्पोर्ट्स, पॅराग्लायडिंगचे आयोजन करून डबल नफा कमावण्याचा प्रकार सुरू आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी जुन्नर तालुक्यातील किल्ले शिवनेरीवर गेले अनेक वर्षांपासून राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य नेत्यांच्या उपस्थितीत व स्थानिक लोकांच्या, संस्थांच्या सहकार्याने हा शिवजयंती महोत्सव साजरा केला जात होता, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षाचे औचित्य साधून गतवर्षीपासून हा महोत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्याचे ठरले. गतवर्षीदेखील खासगी एजन्सीमार्फत हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता. यंदादेखील एक खासगी एजन्सी नियुक्त करून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंती महोत्सव 15 दिवसांवर येऊन ठेपल्यावर एजन्सी नियुक्त करण्यात आली. या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी यांनी शिवजयंती महोत्सव काय कार्यक्रम घेणार याचा आढावा घेतल्यावर एजन्सीने आम्हाला दोन दिवसांपूर्वीच कामाचे टेंडर मिळाले असून, अद्याप काही निश्चित नसल्याचे उत्तर दिले आहे. गतवर्षी ज्या एजन्सीला काम देण्यात आले होते त्याच एजन्सीला यंदादेखील काम देण्यात आले आहे. यामध्ये गतवर्षी जे उपक्रम घेण्यात आले तेच टेंट सिटी, वडज व कुकडी धरण येथे वॉटर स्पोर्ट्स, पॅराग्लायडिंग, हॉट एअर बलून कार्यक्रम घेण्यात आले आहेत. शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही या उपक्रमांसाठी पुन्हा लोकांकडून देखील पैसे घेतले जाणार आहेत. शासनाचा निधी खर्च करून व पुन्हा लोकांकडून पैसे वसूल करून डबल नफा कमावण्याचा फंडा एजन्सी व शासनाच्या पर्यटन विभागाने तयार केला आहे.

स्थानिक उपक्रमांना नफा राखून मदत
गेले अनेक वर्षांपासून जुन्नर तालुक्यातील स्थानिक लोक व काही संस्था शिवजयंती महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम नियमित आयोजित करतात. तसेच गेल्या काही वर्षापासून बैलगाडा शर्यत, कुस्ती, मॅरेथॉन, दुर्गोत्सव- हेरिटेज वॉक हे उपक्रम शिवजयंती महोत्सवाची नवी ओळख निर्माण करत आहेत. या उपक्रमांना शासनाच्या या निधीतून मदत करण्याची आग्रही मागणी आमदार अतुल बेनके यांनी केली. यावर संबंधित एजन्सीकडून 'आमचा नफा राखून जी शक्य होईल ती मदत करू' असे उत्तर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या बैठकीत दिले. यामुळे आता पर्यटन विभागाकडून खर्‍या अर्थाने शिवाजी महाराजांचे विचार, जुन्नर तालुका पर्यटन विकासला गती देणारे उपक्रम राबविण्यात येणार की केवळ टक्केवारीसाठी वाटेल ते कार्यक्रम राबविणार याकडे जुन्नरकरांचे लक्ष लागले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news