‘समाज विकास’च्या रिक्त पदांकडे दुर्लक्ष; कार्यरत कर्मचार्‍यांवर कामाचा ताण  | पुढारी

‘समाज विकास’च्या रिक्त पदांकडे दुर्लक्ष; कार्यरत कर्मचार्‍यांवर कामाचा ताण 

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आर्थिकदृष्ट्या मागास नागरिकांशी संबंधित योजना राबवणार्‍या महापालिकेतील समाज विकास विभागातील रिक्त पदांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने कामाचा ताण वाढत असल्याच्या तक्रारी कार्यरत कर्मचार्‍यांकडून केल्या जात आहेत.
महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने महिला व बाल कल्याण, शहरी गरीब योजना, दिव्यांग योजना, शिष्यवृत्ती आदी योजना राबवल्या जातात. तसेच राज्य शासन आणि केंद्र सरकारच्या काही योजना राबवण्याची जबाबदारी या विभागावर आहे.

मात्र, या विभागातील 24 पदे रिक्त असूनही भरती केली जात नाही. समाजसेवक हे पद महत्त्वाचे असून या पदाच्या सतरा जागा रिक्त आहेत. त्यामुळे इतर अधिकार्‍यांवर कामाचा ताण वाढत आहे. प्रत्येकाला पाचहून अधिक योजनांवर काम करावे लागत आहे. या विभागात सर्वांत महत्त्वाचे पद समाजसेवक असून त्याच्या 20 जागा मंजूर आहेत. त्यातील 17 जागा रिक्त आहेत. तसेच समाज विकास अधिकारी या पदाच्या दोन जागा मंजूर असून त्या दोन्ही रिक्त आहेत.

उपसमाज विकास अधिकारी या पदाच्या दोन जागा मंजूर असून त्यापैकी एक जागा रिक्त आहे. उपअधिक्षक या पदाच्या दोन जागा मंजूर असून त्या दोन्ही रिक्त आहेत. लघु टंकलेखक, वाहनचालक यांच्या मंजूर प्रत्येकी एक जागा आणि बिगारी या पदाच्या दोन मंजूर जागाही रिक्त आहेत.

समूह संघटिकांची भरती

समूह संघटिका, समुपदेशक, सेवा केंद्र समन्वयक, स्वच्छता स्वयंसेवक, विरंगुळा केंद्र सहाय्यक आदी पदांच्या 149 जागा भरण्यात आल्या असून 11 जागा रिक्त आहेत.

हेही वाचा

Back to top button