Mpsc Exam : नियुक्त्या द्या; नाहीतर आंदोलन : पात्र उमेदवारांचा इशारा | पुढारी

Mpsc Exam : नियुक्त्या द्या; नाहीतर आंदोलन : पात्र उमेदवारांचा इशारा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र कृषी सेवा 2021 परीक्षेमधून शिफारस प्राप्त 203 उमेदवार सर्व प्रशासकीय प्रक्रिया होऊनही सात महिन्यांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या पात्र उमेदवारांनी पुण्यातील कृषी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा पात्र उमेदवारांनी दिला आहे. उमेदवारांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा 2021 मध्ये झाली आणि 12 जुलै 2023 मध्ये निकाल लागून यामध्ये गट अ आणि गट ब चे 203 उमेदवार उत्तीर्ण होऊन त्यांची आयोगाकडून शिफारस करण्यात आली. यानंतर 17 व 18 ऑगस्ट 2023 रोजी उमेदवारांची कागदपत्रांची तपासणी झाली.

अशा प्रकारे प्रशासकीय काम पूर्ण होऊनही शासन निर्णयाअभावी सात महिन्यांपासून नियुक्त्या रखडल्या आहेत. विशेष म्हणजे 10 जानेवारीला नागरी सेवा मंडळाची बैठक झाली. त्यात प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्यात आला. त्यात अप्पर मुख्य सचिवाने या प्रस्तावाला मान्यता दिली असून प्रस्ताव कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यांनी 26 जानेवारीपर्यंत नियुक्त्या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, आतापर्यंत नियुक्त्या दिल्या नाहीत. नियुक्त्यांसाठी उमेदवार खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. लोकसभा आचारसंहिता लागू झाली तर नियुक्त्या रखडण्याची शक्यता असल्यामुळे उमेदवारांच्या मनात चिंतेचे वातावरण आहे. त्यामुळे नियुक्त्या द्याव्यात, नाहीतर आंदोलन करणार असा इशारा उमेदवारांनी दिला आहे.

आम्ही अनेक अडचणींचा सामना करून हे यश मिळवले आहे. निवड होऊन तब्बल सात महिने उलटून सुद्धा नियुक्ती मिळालेली नाही. त्यामुळे कुटुंबावर आर्थिक संकट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमच्या सारखी उत्तीर्ण झालेली मुले- मुली निराशेच्या गर्तेत जाण्याची शक्यता आहे. आम्ही पास होऊन ही आमच्या घरच्यावर मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. घरचे नियुक्तीकडे डोळे लावून बसले आहेत. तरी सरकारला आदरपूर्वक विनंती आहे की, आमच्या नियुक्त्या लवकरात लवकर द्याव्यात.

– एक उत्तीर्ण परीक्षार्थ

हेही वाचा

Back to top button