जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके अनंतात विलीन | पुढारी

जुन्नरचे माजी आमदार वल्लभ बेनके अनंतात विलीन

नारायणगाव; पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्याचे माजी आमदार वल्लभ दत्तात्रेय बेनके यांचे रविवारी (दि.११) रात्री साडेदहा वाजता निधन झाले. आज सोमवारी (दि.१२) हिवरे या त्यांच्या मूळगावी शेतात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
यावेळी विविध पक्षातील राजकीय नेत्यांसह, विविध क्षेत्रातील मान्यवर व जुन्नर तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अंत्यविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे, आमदार रुपेश जगताप, आमदार निलेश लंके, आमदार दिलीप मोहिते, आमदार अशोक पवार, खासदार अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव, ‘विघ्नहर’चे अध्यक्ष सत्यशील शेरकर, माजी आमदार शरद सोनवणे, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार दिलीप ढमढेरे, मनसे तालुका अध्यक्ष मकरंद पाटे, भाजपा नेत्या आशा बुचके, तसेच विविध पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

श्रद्धांजली अर्पण करताना शरद पवार म्हणाले की, वल्लभ बेनके शब्दाला पक्के होते. जुन्नरच्या जनतेची आमदार म्हणून चार टर्म त्यांनी सेवा केली. विश्वासाला पात्र ठरले. महिन्याभरापूर्वी मी त्यांना भेटायला आलो होतो. तेव्हा त्यांनी आमदार अतुल बेनके यांना काय सल्ला दिला, हे मी आयुष्यभर विसरू शकत नाही. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, वल्लभ बेनके यांचा स्वभाव करारी होता. प्रशासनावर त्यांचा मोठा वचक होता. जेष्ठ आमदार म्हणून आम्ही त्यांच्या सूचनांचा नेहमीच आदर करायचो. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन त्यांचा मुलगा विद्यमान आमदार अतुल बेनके चांगले काम करत आहे. यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा :

Back to top button