नवीन टर्मिनल पाहतेय पंतप्रधानांची वाट ! काम 100 टक्के पूर्ण

नवीन टर्मिनल पाहतेय पंतप्रधानांची वाट ! काम 100 टक्के पूर्ण
पुणे : पुढारी वृत्तसेवा : लोहगाव येथील नव्या विमानतळ टर्मिनलचे काम 100 टक्के  पूर्ण झाले आहे. मात्र, हे टर्मिनल सुरू करण्याला अद्याप मुहूर्त  मिळालेला नाही. उद्घाटनासाठी राजकीय नेते, विमानतळ  अधिकारी पंतप्रधानांच्या वेळेची वाट पाहत आहेत. सातार्‍यातील नियोजित कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. त्यांचा येथील दौरा निश्चित आहे. त्याच वेळी ऑनलाइनरीत्या किंवा त्या दिवशी पुण्यातील या नव्या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावे, अशी इच्छा पुण्यातील सत्ताधारी पक्षातील राजकीय नेत्यांची आहे.
तसेच, विमानतळ अधिकार्‍यांना देखील याचे उद्घाटन पंतप्रधानांनी करावे, असेच वाटत आहे. त्यादृष्टीने सर्व तयारी देखील झाली आहे. मात्र, पंतप्रधानांची वेळ याकरिता मिळाली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येत्या 19 तारखेच्या कार्यक्रमात या टर्मिनलचे उद्घाटन व्हावे, अशी या वर्तुळातून इच्छा व्यक्त केली जात आहे.
बड्या मंत्र्यांनी केली पाहणी
पुण्यातील लोहगाव येथील नवीन टर्मिनलची उभारणी केल्यानंतर याची पाहणी नुकतीच बड्या नेत्यांनीदेखील केली. यात केंद्रीय हवाईमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मागील महिन्यात या टर्मिनलची बारकाईने पाहणी केली. त्या वेळी त्यांना आढळलेल्या बारीकसारीक त्रुटींमध्ये तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश त्यांनी विमानतळ अधिकार्‍यांना दिले. त्या वेळी त्यांनी तीन आठवड्यांत या टर्मिनलचे उद्घाटन करणार असल्याचे सांगितले. यानंतर तीन दिवसांपूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील पुण्यातील नवीन टर्मिनलची पाहणी केली. त्या वेळी त्यांनी येथील धावपट्टी वाढविण्यासंदर्भात येथील प्रशासकीय अधिकार्‍यांशी चर्चा केली.  तसेच, या वेळी पवार यांनी या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हावे, याकरिता प्रयत्नशील असल्याचे सांगितले.असे आहे नवीन टर्मिनल…
जुने विमानतळ टर्मिनल : 22 हजार चौरस मीटर
नवीन विमानतळ टर्मिनल : 5 लाख चौरस फुटांपेक्षा
अधिक क्षेत्रफळ
जुन्या टर्मिनलची प्रवासीक्षमता  : 80 लाख प्रवासी (वार्षिक)
नवीन टर्मिनल प्रवासीक्षमता : 1 कोटी 90 लाख (वार्षिक)
नव्या टर्मिनलवर या सुविधा…
प्रवाशांना विमानापर्यंत पोहचविणारे 5 नवीन मार्ग
(पॅसेंजर बोर्डिंग बि—ज)
8 स्वयंचलित जिने (एस्केलेटर)
15 लिफ्ट
34 चेकइन काउंटर
प्रवासी सामान वहन यंत्रणा
आगमन क्षेत्रात पाच कन्व्हेअर बेल्ट

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news