राष्ट्रवादीच्या जन्मापासून सोबत : मंत्री छगन भुजबळ | पुढारी

राष्ट्रवादीच्या जन्मापासून सोबत : मंत्री छगन भुजबळ

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  कोण म्हणतं पक्ष चोरला ? लक्षात ठेवा, लोकशाही आहे. ज्या बाजूने बहुमत आहे, त्यांच्या बाजूने निर्णय लागतो. म्हणूनच आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हही मिळालं. राष्ट्रवादी पक्षाच्या जन्मापासून आपण तेथे होतो, पक्षाचे चिन्ह आणि झेंडा माझ्या बंगल्यात ठरविला गेला. सुदैवाने त्यात आमचा सिंहाचा वाटा होता, त्यामुळे आता वाईट वाटून घ्यायचं कारण नाही, असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी केले. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने युवा मिशन मेळाव्याचे आयोजन केले होते, त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, कर्जत-जामखेडचे नेते स्वत:ला तरुणांचे नेते म्हणवत आहेत, परंतु त्यांच्या अवतीभवती पगारी कार्यकर्ते असल्याची टीका आमदार रोहित पवार यांच्यावर भुजबळ यांनी केली आहे.

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले, अजित पवारांवर टीका करण्याची मोहीम उभारली आहे. मोकळेपणाने सांगतो, 2014 साली स्वतंत्रपणाने आपण लढलो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस सरकारला आम्ही पाठिंबा दर्शवला, तशी घोषणा केली. पण त्यावेळी तो निर्णय अंमलात आला नाही. 2019 साली आम्हाला सांगण्यात आलं की भाजपसोबत चर्चा सुरू ठेवा. अजित पवार यांनी वरिष्ठांचा शब्द खाली पडू दिला नाही. अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शपथ घेतल्याचे तटकरे म्हणाले. मेळाव्यामध्ये अहमदनगर येथील राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांच्यासह इतरांचा पक्षप्रवेश झाला.

मंत्री धनंजय मुंडे काय म्हणाले…
2 जुलैला आम्ही सर्वांनी एक निर्णय घेतला. त्यानंतर 5 जुलैच्या सभेला खर्‍या अर्थाने लोकशाही दिसली.

6 फेब्रुवारीला लोकशाहीचा विजय झाला. पक्ष आणि चिन्हही आपलं झालं. आता इथून पुढं फक्त अजित पर्व असणार. पुढची 50 वर्षे ही अजित पवारांचीच आहेत.

तिकडे राहिलेले कष्टीवादी. त्या कष्टीवादीतील भामटे आता काहीही बरळू लागलेत. आता ते जसे समोरून येतील तसे शिंगावर घ्यायची तयारी तुम्ही सर्वांनी ठेवा.

अजित पवार आणि आम्हा सर्वांवर मर्यादा सोडून बोलाल तर आम्ही
सोडणार नाही.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे  ही पहिल्यापासून भूमिका…
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही भूमिका आपली पहिल्यापासून आहे. 15 ते 17 फेब—ुवारी दरम्यान मराठा आरक्षण संदर्भात नवा कायदा येतोय. त्याला आपला खंबीर पाठिंबा आहे. लहान-सहान सर्वांना सोबत घेऊन पुढं जावं लागेल. अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्याचं आपलं स्वप्न आहे. यासाठी अल्पसंख्याकांनाही सोबत घेऊन जावं लागेल. कोणावर ही अन्याय होता कामा नये, असेही मंत्री भुजबळ म्हणाले.

Back to top button