शिक्षक भरतीसाठी आज प्राधान्यक्रमास शेवटची संधी | पुढारी

शिक्षक भरतीसाठी आज प्राधान्यक्रमास शेवटची संधी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षक भरतीस पात्र असलेल्या उमेदवारांना पवित्र पोर्टलवर जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. ही सुविधा येत्या 9 ते 12 फेब्रुवारी या कालावधीमध्ये सुरू राहणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार उद्या, सोमवारी (दि.12) प्राधान्यक्रम लॉक करण्याचा शेवटचा दिवस आहे. प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसलेल्या उमेदवारांना खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांमधील नववी ते बारावी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधादेखील सुरू आहे. त्यामुळे संबंधित उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्याची कार्यवाही करावी.

अभियोग्यताधारकांकडून ई-मेलद्वारे प्राप्त झालेल्या मुद्द्यांना पोर्टलवर एकत्रितरित्या न्युज बुलेटिनद्वारे उत्तरे देण्यात येत आहेत. अभियोग्यताधारकांचे वेळ, श्रम वाचविण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे कार्यालयात गर्दी करू नये तसेच कोणाही अधिकारी, कर्मचारी अथवा अनाधिकृत व्यक्ती यांना व्यक्तींशः संपर्क करू नये, असेही आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अडचणी येत असल्यास अशा उमेदवारांनी त्यांनी पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची आवश्यक ती कार्यवाही करावी. प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाहीत. त्यामुळे प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे अनिवार्य आहे, असेही शिक्षण विभागातर्फे कळवण्यात आले आहे.

 

 

Back to top button