विकासासाठी पक्ष सोडला म्हणणे चूक : शरद पवार

विकासासाठी पक्ष सोडला म्हणणे चूक : शरद पवार

पुणे; पुढारी वृत्तसेवा : काही लोक राज्याच्या विकासासाठी भाजपसोबत गेलो असे सांगत आहेत. मात्र, त्यांचा दावा सत्य नाही. काही नेत्यांची तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती. ती चौकशी सत्तेत गेल्यावर बंद झाली. त्यामुळे विकासासाठी पक्ष सोडला, असे म्हणणे चूक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलच्या वतीने (शरदचंद्र पवार) राबविण्यात येणार्‍या 'शरदचंद्र पवार संजीवनी आरोग्य मित्र अभियाना'चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले. पवार म्हणाले, आज देशात कोणीही भाजपच्या विचाराच्या विरोधात भूमिका घेतली की, त्याच्याविरोधात सत्तेचा गैरवापर केला जाते. यापूर्वी महाराष्ट्रात ईडी हा शब्द कोणाला माहिती नव्हता. 2014 ते 2023 या काळात ईडीकडून सहा हजार केसेस नोंदवल्या गेल्या. चौकशीनंतर त्यापैकी 25 प्रकरणांमध्ये तथ्य आढळून आले. त्यापैकी फक्त दोघांना शिक्षा झाली. ईडीच्या या सगळ्या कामासाठी 404 कोटी रुपये खर्च झाले. अनेक नेत्यांच्या चौकशी झाल्या, यापैकी 85 टक्के नेते विरोधी पक्षातील आहेत. भाजपच्या काळात 121 नेत्यांवर ईडीची कारवाई झाली. परंतु कारवाई झालेल्या लोकांमध्ये भाजपच्या एकाही नेत्याचा समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले.

आमचा पक्ष दुसर्‍याला दिला

आम्ही आमचा पक्ष दुसर्‍याला दिला. पक्षाची उभारणी करणार्‍यांच्या हातून काढून घेऊन तो दुसर्‍याला दिला, असे देशात कधी घडले नव्हते. निवडणूक आयोगाने ते करून दाखवले. लोक याला समर्थन देणार नाहीत, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

बारामतीकर समंजस

बारामतीचे लोक साधे, सरळ आणि समंजस आहेत. ते योग्य तो निर्णय घेतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे बारामतीत येणार्‍या प्रत्येकाचे स्वागत आहे, असे ते म्हणाले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news