राजकारण : तामिळनाडूमधला ‘दलपती शो’ | पुढारी

राजकारण : तामिळनाडूमधला ‘दलपती शो’

प्रथमेश हळंदे

तमिळ सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता ‘दलपती’ विजय जोसेफ आता राजकारणात प्रवेश करतोय. ‘तमिळगं वेट्रीक्कळगम’ हा त्याचा नवा पक्ष. लवकरच तो सिनेमातून पूर्णपणे निवृत्तीही घेतोय. तमिळ सिनेसृष्टी आणि तामिळनाडूचं राजकारण यांच्यातलं नातं हा खरं तर एका मोठ्या ग्रंथाचाच विषय आहे. आता या ग्रंथात दलपती विजय या नव्या प्रकरणाची भर पडलीय.

‘पिरप्पकुम एला उयीरकुम’ दलपती विजयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर 2 फेब्रुवारीला आपल्या ‘तमिळगं वेट्रीक्कळगम’ या पक्ष स्थापनेची अधिकृत घोषणा करणारं पत्र पोस्ट केलं. त्यावर उजव्या कोपर्‍यातल्या विजयच्या फोटोखालची ही ओळ. पक्षाचं घोषवाक्य. याचा अर्थ होतो – जन्माने सर्वच समान आहेत. आपल्या पत्रात विजयने स्वतःची राजकीय महत्त्वाकांक्षा तर स्पष्ट केलीच आहे, त्याचबरोबर त्याने सिनेक्षेत्रातून निवृत्ती घेत असल्याचंही जाहीर केलंय. विजयचा हा निर्णय त्याच्या चाहत्यांनी मिठाई वाटून साजरा केल्याचे असंख्य व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. वास्तविक, एखाद्या सिनेकलाकाराने राजकारणात सक्रिय होणं, हे काही नवं नाही. त्यात गेल्या पाच दशकांत सिनेक्षेत्राशी संबंधित सहा व्यक्तींना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार्‍या तमिळ जनतेला राजकारण आणि सिनेमा हे नातं अजिबातच नवं नाही.

अण्णादुराई ते स्टॅलिन

तामिळनाडूच्या राजकारणात दलपती विजयसारख्या सिनेकलाकारांसाठी पाऊलवाट तयार करण्याचं खरं श्रेय जातं ते तामिळनाडूचे पहिले मुख्यमंत्री सी. एन. अण्णादुराई यांना. द्राविडी चळवळीचे जनक असलेल्या पेरियार यांच्या तालमीत वाढलेल्या अण्णादुराईंनी द्राविडी विचारसरणीवर आधारित अनेक नाटकं लिहिली. आपल्या राजकीय फायद्यासाठी द्राविडी विचारधारेला जनतळात पोहोचवण्यासाठी सिनेमासारख्या लोकप्रिय माध्यमाचा ताकदीने वापर करणारा हा पहिला द्रविड नेता. पुढे पेरियारांशी फारकत घेऊन अण्णादुराईंनी द्रविड मुन्नेत्र कळगम अर्थात ‘द्रमुक’ची स्थापना केली. पटकथाकार करुणानिधी आणि अभिनेता एम. जी. रामचंद्र हे अण्णादुराईंचे आघाडीचे मोहरे तमिळ सिनेमातून द्राविडी विचारधारा पसरवू लागले. करुणानिधी लेखणी आणि वाणीतून पक्ष सांभाळत होते, तर एमजीआर सिनेमातून तो लोकप्रिय करत होते. अण्णादुराईंच्या मृत्यूनंतर करुणानिधींनी द्रमुकची सूत्रं आपल्या हातात घेतली आणि ते मुख्यमंत्री झाले.

कालांतराने अंतर्गत वादामुळे एमजीआर यांनी द्रमुक सोडून ‘अण्णा द्रमुक’ची स्थापना केली. द्रमुकचा चेहरा म्हणून सिनेमातून घरोघरी पोहोचवलेले एमजीआर पुढच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने सत्ता मिळवत तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले. अभिनेता म्हणून भारतात मुख्यमंत्रिपद मिळवणारे ते पहिलेच! पुढे एमजीआर यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी आणि अभिनेत्री जानकी रामचंद्रन यांना पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रिपदावर बसवलं.

पक्षांतर्गत फुटीमुळे जानकी रामचंद्रन यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. त्यावेळी विस्कळीत झालेल्या अण्णा द्रमुकची पुन्हा मोट बांधली ती तमिळ सिनेसृष्टीची अनभिषिक्त सम्राज्ञी जयललिता यांनी. एमजीआर यांच्या राजकीय वारशावर आपलाच हक्क असल्याचं ठणकावून सांगत त्याच पुढे मुख्यमंत्रीही बनल्या. आता मुख्यमंत्री असलेले द्रमुकचे एम. के. स्टॅलिन यांनीही काही काळासाठी अभिनय क्षेत्रात आपलं नशीब अजमावून पाहिलंय.

सिनेमात स्टार, राजकारणात स्टार प्रचारक

सिनेक्षेत्रातून येऊनही राज्याच्या राजकारणावर एक मुख्यमंत्री म्हणून आपला स्वतंत्र ठसा उमटवणार्‍या या नेत्यांना फक्त राजकारण्यांचाच सामना करावा लागला, असं नाही. असे अनेक सिनेकलाकार होते, ज्यांना राजकारणात उतरण्यात आणि टिकून राहण्यात अपयश येत राहिलं. त्यामुळे, सिनेमातलं अफाट स्टारडम मतपेटीत उतरवता न आलेल्यांची यादी तशी बरीच मोठी आहे.

भारतीय सिनेसृष्टीतल्या सार्वकालिक नटश्रेष्ठांपैकी एक असलेले शिवाजी गणेशन हे असंच एक नाव. इंदिरा गांधींच्या काळात राज्यसभेवर निवडून गेलेल्या शिवाजी गणेशन यांचा राजकीय प्रवास द्रमुक ते जनता पक्ष असा बदलत राहिला. एक अभिनेता म्हणून आजही तमिळ सिनेरसिक त्यांच्यावर भरभरून प्रेम करतात; पण राजकारणात मात्र हे प्रेम मतांमध्ये बदलवण्यात शिवाजी यांना अपयशच आलं.

सुप्रसिद्ध अभिनेता कमल हासनच्या बाबतीतही फारसं आशादायक चित्र नाही. त्याने स्थापन केलेल्या ‘मक्कल निदी मैय्यम’चं भवितव्य अंधारात आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्याला भाजपच्या उमेदवाराकडून थोडक्यात पराभव स्वीकारावा लागला होता. कधी काळी आपल्या सिनेमातून जयललिता आणि तिच्या पक्षाला शिंगावर घेणार्‍या सुपरस्टार रजनीकांतच्या बहुप्रतीक्षित राजकीय वाटचालीचा तर आजघडीला उदयापूर्वीच अस्त झालेला आहे. डिसेंबर 2023 मध्ये निधन झालेल्या कॅप्टन विजयकांत या अभिनेत्याने आपल्या ‘देसीय मुरपोक्कं द्रविड कळगम’ या पक्षाच्या जोरावर राज्यातल्या सगळ्याच बड्या पक्षांना कडवी टक्कर दिली होती. कॅप्टन विजयकांत हा विजयचा सिनेक्षेत्रातला मेंटॉर. विजयकांत यांच्या अंत्यदर्शनासाठी गेलेल्या विजयची शोकाकुल मुद्रा अजूनही तमिळ जनता विसरली नसेल. त्यामुळे राजकारणातही विजय आपल्या गुरूसारखा करिष्मा घडवू शकेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विजयच्या सिनेमातलं आणि सिनेमाबाहेरचं राजकारण

विजयचं मूळ नाव जोसेफ विजय; पण हा ख्रिश्चन अभिनेता ओळखला जातो, तो दलपती विजय या नावाने. ‘दलपती’ म्हणजे सेनापती, सेनानायक. विजयच्या सिनेमांना, सिनेमांशी संबंधित कार्यक्रमांना होणारी गर्दी, त्याची जनमानसातली क्रेझ, कधी सिनेमातून, तर कधी पब्लिक प्लॅटफॉर्मवर विजय तो मांडत असलेली भूमिका हे सगळंच एकत्रितपणे त्याच्या ‘दलपती’ या बिरुदावलीला साजेसं ठरवत असतं. प्रामुख्याने मारधाडपटांना प्राधान्य देणार्‍या विजयने गेल्या दशकभरात बंडखोर जननायकाच्या स्वरूपातल्या भूमिका साकारल्या आहेत. दुष्ट शक्तींशी एकट्याने भिडू पाहणारा हा जननायक कधी वर्दीत असतो, तर कधी मच्छीमार असतो, तर कधी तो कॉलेज प्रोफेसर किंवा गावातला बाहुबली, रावडी नेताही असतो. हा जननायक व्यवस्थेने नाडलेल्यांचा ‘तलैवा’ही आहे आणि समांतर प्रशासकीय व्यवस्था राबवू पाहणारा ‘सरकार’ही आहे.

या मास अपील असणार्‍या भूमिका आपल्याला राजकारणात फायद्याच्या ठरू शकतात, असं विजयला वाटणं साहजिकच आहे. 2009 मध्ये ‘विजय मक्कल इयक्कम’ या फॅन क्लबची स्थापना केल्यानंतर, त्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले गेले आहेत. आपल्या सिनेमात प्रत्यक्षपणे कोणत्याही राजकीय पक्षाला समर्थन न देणार्‍या विजयच्या या फॅन क्लबने 2011 च्या विधानसभा निवडणुकीसाठी अण्णा द्रमुकला पाठिंबा देऊ केला होता.

2021 मध्ये या फॅन क्लबने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 169 जागा लढवून 115 जागांवर विजय मिळवला होता. आता याच संस्थेचं ठोस असं राजकीय स्वरूप ‘तमिळगं वेट्रीक्कळगम’च्या निमित्ताने समोर आलंय. येत्या लोकसभा निवडणुकीत हा पक्ष लढणार नसून, थेट 2026 च्या विधानसभा निवडणुकीत उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत विजयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात दिलेले आहेत.

व्यक्तिपूजक सिनेरसिक की सुज्ञ मतदार?

विजयचे समकालीन प्रतिस्पर्धी म्हणून द्रमुकच्या युवक कल्याण आणि क्रीडा विकासमंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष अण्णामलाईंकडे पाहिलं जातं. दोघेही तितकेच प्रभावशाली आणि लोकप्रिय राजकारणी आहेत. ‘मामन्नन’ या आपल्या शेवटच्या सिनेमातून सामाजिक न्यायाचा संदेश देणारा अभिनेता उदयनिधी आणि अण्णा द्रमुक पोखरून भाजपचं बळ वाढवणारा अण्णामलाई यांचं आजवरचं राजकीय वजन विजयसाठी आव्हान निर्माण करायला पुरेसं आहे.

नेडूंचळीयन, पनीरसेल्वम आणि पळणीस्वामी या तीन माजी मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता तामिळनाडूला लाभलेले इतर सहाही मुख्यमंत्री हे तमिळ सिनेसृष्टीशी संबंधित आहेत. साहजिकच, सिनेमा हे प्रचंड ताकदीचं माध्यम असल्याची जाण तमिळ मतदार, राजकारणी आणि कलाकारांनाही आहे. त्यामुळे ‘आपण बरं आणि आपलं काम बरं’ असा साळसूद, तटस्थ अविर्भाव मिरवणं तमिळ कलाकारांना परवडत नाही.

तमिळ सिनेकलाकारांच्या पडद्यामागच्या जगावरही व्यक्तिपूजक सिनेरसिकांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे स्थानिकांच्या प्रश्नांसाठी आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून वेळोवेळी सामाजिक, राजकीय भूमिका घेणार्‍या ताठ बाण्याच्या सिनेकलाकारांचं ठळक प्रमाण तमिळ सिनेसृष्टीत दिसून येतं. विजयही त्याला अपवाद नाही. आता लवकरच तो सिनेसृष्टीतून निवृत्ती घेत पूर्णवेळ राजकारणात सक्रिय होणार आहे. अशावेळी सिनेमासारखं माध्यम हाताशी नसतानाही तो आपला प्रभाव कितपत टिकवून ठेवतो, हे पाहणं रंजक ठरणार आहे.

Back to top button