पुष्पप्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन | पुढारी

पुष्पप्रदर्शनास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजन

कसबा पेठ/पुणे : पुढारी वृत्तसेवा : डेलिया, आर्किड, अ‍ॅन्थुरिअम, जरबेरा, गुलाब, कार्नेशन यासह विविधरंगी फुले, त्यांची लक्षवेधी मांडणी, आकर्षक सजावट पाहून अबालवृद्ध, महिला आणि सर्वच वयोगटातील पुरुष हरखून गेले होते. फुलांबरोबर सेल्फी घेताना त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसत होता. निमित्त होते, पुष्पप्रदर्शनाचे. उद्यान विभाग आणि द रोझ सोसायटी ऑफ पुणेतर्फे पुणे महानगरपालिकेच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त 42 वे फळे, फुले व भाजीपाला प्रदर्शनाचे शनिवार (दि. 10) रविवार (दि. 11) फेब—ुवारीला संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता येथे आयोजन करण्यात आलेले आहे. याचे उद्घाटन शनिवारी (दि.10) आयुक्त विक्रम कुमार यांच्या हस्ते झाले.
या वेळी मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे, संतोषकुमार कांबळे, राहुल साळुंके, संदीप काळे, द. स. पोळेकर, शिल्पा भोसले तसेच उद्यान विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यानिमित्त घेण्यात आलेल्या स्पर्धांमध्ये 1100 स्पर्धकांनी विविध विभागांमध्ये 3000 इतक्या प्रवेशिका घेतलेल्या असून,  पारितोषिक वितरण विवारी (दि. 11) अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये बोन्साय, फीचर्स गार्डन, पुष्करणीच्या विविध पुष्परचना इत्यादी नागरिकांना पाहावयास मिळणार आहे.

प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण

प्रदर्शनामध्ये वेगवेगळे एकूण 266 विभाग असून, त्यामध्ये शोभिवंत पानाफुलांच्या कुंड्यांची मांडणी, औषधी वनस्पतींचा संग्रह, गुलाबपुष्पांची मांडणी, हंगामी फुले, टेबल सजावट, वेगवेगळ्या प्रकारची फुले, भाजीपाला, सॅलेड डेकोरेशन, बचत गटातील महिलांनी फळे, भाजीपाल्यावर प्रक्रिया करून तयार केलेले पदार्थ, विविध प्रकारचे हार, पुष्पगुच्छ, शिप, वेण्या प्रदर्शनात मांडण्यात आलेले होते तसेच निसर्ग व पर्यावरणावर आधारित छायाचित्रांसाठी स्वतंत्र विभाग ठेवण्यात आलेले आहेत. विविध प्रकारचे डेलिया, आर्किड, अ‍ॅन्थुरिअम, जरबेरा, गुलाब, कार्नेशन इ. प्रकारची हंगामी तसेच बहुवार्षिक फुलझाडे या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण आहे. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या उद्यानांच्या प्रतिकृती पाहण्यासाठी तयार करण्यात आलेल्या आहेत.
हे प्रदर्शन 10 ते 11 फेब—ुवारीला संभाजी उद्यान, जंगली महाराज रस्ता येथे सकाळी 11 ते सायंकाळी 8.30 वाजेपर्यंत नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले राहणार आहे. तरी शालेय विद्यार्थी, शेतकरी, बागेची आवड असलेले नागरिक तसेच संस्थांनी प्रदर्शनामध्ये जास्तीत जास्त सहभाग घ्यावा.
– अशोक घोरपडे, उद्यान अधीक्षक, महापालिका
हेही वाचा

Back to top button