मेट्रोकडून सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष : महापालिका प्रशासनाकडून बघ्याची भूमिका | पुढारी

मेट्रोकडून सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष : महापालिका प्रशासनाकडून बघ्याची भूमिका

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका शहराच्या सुशोभीकरणावर कोट्यवधींचा खर्च करीत आहे. मात्र, महामेट्रोकडून सुशोभीकरणाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे शहराच्या सौंदर्यास बाधा निर्माण होत आहे. महामेट्रोच्या या उदासीन भूमिकेबाबत महापालिका प्रशासन मूग गिळून गप्प असल्याने शहरवासीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. शहरात चिंचवड मदर टेरेसा उड्डाण पूल ते दापोडीच्या हॅरिस पुलापर्यंत अशा 7.5 किलोमीटर अंतराची मेट्रोची मार्गिका तयार होऊन दोन वर्षांहून अधिक कालावधी झाला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी या मार्गावर 6 मार्च 2022 ला मेट्रो सुरू झाली. फुगेवाडीच्या पुढे रुबी हॉल व वनाजपर्यंत मेट्रो 1 ऑगस्ट 2023 ला सुरू झाली.

असे असले तरी, महामेट्रोने पूवर्वत केलेल्या दुभाजकामध्ये झाडे लावून सुशोभीकरण करण्यात आलेले नाही. काही ठिकाणी केवळ माती टाकून ठेवली आहे; मात्र त्यामध्ये छोटी झाडे लावण्यात आलेली नाहीत. दुभाजकात कचरा साचून दुर्गंधी निर्माण झाली आहे. काही ठिकाणी काटेरी झुडपे उगविली आहेत. तर, काठी ठिकाणी पालापोचाळा साचला आहे. व्यवस्थित काम न केल्याने कासारवाडी भागात दुभाजकाची दुरवस्था झाली आहे. मेट्रोच्या अनेक पिलरवर पोस्टर चिकटविण्यात आल्याने ते विद्रुप दिसत आहे. खराळवाडी येथे दुभाजकामध्ये हिरवळ तयार करण्यात आली होती; मात्र, निगा न राखल्याने ती जळून गेली आहे.

स्टेशनवर निर्माण होणार्‍या सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्या पाण्याचा पुनर्वापर केला जाईल, असा दावा महामेट्रोने केला होता; मात्र स्टेशनखालील टाकीत सांडपाणी जमा होऊन घाण पाणी रस्त्यावरून वाहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी सुटली आहे. हा प्रकार महापालिका भवनासमोर घडत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, स्टेशनखालील परिसरात दिव्याची व्यवस्था नसल्याने अंधार असतो. कासारवाडी मेट्रो स्टेशनखालील अनेक जुनी झाडे निगा न राखल्याने जळाली आहेत. पावसाळ्यात मार्गिकेतून पाणी थेट रस्त्यांवर पडते.

महापालिकेकडून शहर सौंदर्य वाढीसाठी विविध प्रकारे सुशोभीकरण करण्यात येत आहे. फुलदाणीप्रमाणे अनेक ठिकाणी फुलझाडे लावण्यात आली आहे. आकर्षक विद्युत रचना करण्यात आली आहे. दुभाजकात झाडे लावण्यात आली आहेत. दिव्यांच्या खांबावर आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यामुळे शहर उजळून निघाले आहे. तसेच, नियमितपणे रस्ते साफसफाई केली जात आहे. या स्वच्छता व सजावटीसाठी महापालिकेस अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. मात्र, मेट्रोकडून सुशोभीकरणाकडे दुर्लक्ष होत असल्याने नागकिरांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

कशाही प्रकारे स्टेशनची उभारणी

महामेट्रोने रस्त्यावर स्टेशन उभारले आहेत. स्टेशनवर ये-जा करण्यासाठी प्रवाशांसाठी पूल व जीने निर्माण केले आहेत. महापालिकेने तयार केलेल्या पदपथ व रस्त्यांची रचना लक्षात न घेता मेट्रोने मनमर्जीप्रमाणे अधिक रुंद व वेडीवाकडे पदपथ तयार केले आहेत. तसेच, पादचारी पुलाची रचना व उभारणी कश्याही प्रकारे केल्याने तो भाग आणि चौकाचे विद्रुपीकरण झाले आहे. मोरवाडी व पिंपरी चौकात महापालिकेने सजावट केली आहे. मात्र, मेट्रो स्टेशन व पिलरमुळे त्या चौकाची शोभा गेली आहे. तसेच, वाहतुकीस अडथळाही निर्माण होत आहे.

पिंपरी-चिंचवडमधील मेट्रो

  • दापोडी ते चिंचवड अंतर – 7.5 किलोमीटर
  • एकूण सहा स्टेशन – पिंपरी-चिंचवड महापालिका, संत तुकाराम नगर, नाशिक फाटा, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी
  • दुभाजकावर झाडे लावलेली नाहीत
  • अनेक स्टेशनची कामे अपूर्ण
  • जिन्याची कामे अर्धवट

पिंपरी, कासारवाडी, दापोडी मेट्रो स्टेशनची कामे अपूर्ण

मेट्रो सुरू होऊन दोन वर्षे झाले आहेत. मात्र, अद्याप पिंपरी, कासारवाडी व दापोडी या मेट्रो स्टेशनची कामे सुरूच आहे. रात्री-अपरात्री थेट रस्ता बंद करून कामे केली जातात. थेट रस्ता बंद करण्यात येत असल्याने वाहनचालकांना नाहक वळसा मारून ये-जा करावी लागत आहे. महामेट्रोच्या या कासव गती कामाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे. महापालिकेकडूनही निव्वळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

पार्किंगची व्यवस्था नसल्याने पदपथावर अतिक्रमण

महापालिकेने महामेट्रोस पार्किंगसाठी तब्बल 12 ठिकाणी मोक्याच्या जागा दिल्या आहेत. त्यापैकी एकाही ठिकाणी महामेट्रोस पार्किंग विकसित करता आलेले नाही. मेट्रो स्टेशनखाली पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिक पदपथ व रस्त्यांवर वाहने लावून मेट्रोने प्रवास करीत आहेत. परिणामी पादचार्यांची गैरसोय होत आहे. तसेच, स्टेशन परिसरात रिक्षाचालकांची गर्दी होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

हेही वाचा

Back to top button