दिल्लीतील नवसाक्षरता मेळाव्यात महाराष्ट्राचा सहभाग ठरला लक्षवेधी | पुढारी

दिल्लीतील नवसाक्षरता मेळाव्यात महाराष्ट्राचा सहभाग ठरला लक्षवेधी

बारामती : पुढारी वृत्तसेवा : असाक्षर आणि स्वयंसेवक यांना प्रेरणा देणारी बारामती अन् सातारा येथील छायाचित्रे, रत्नागिरी येथील साक्षरताविषयक कलाकृती, कोल्हापूरच्या पथकाने हिंदीतून अफलातून सादर केलेला पोवाडा, साक्षरताविषयक उपक्रमांची माहिती
देणारा सर्वसमावेशक स्टॉल तसेच अमरावती व गडचिरोली येथील स्वयंसेवक आणि असाक्षर यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीने नवभारत साक्षरता राष्ट्रीय मेळाव्यातील महाराष्ट्राचा सहभाग लक्षवेधी ठरला. या मेळाव्यात बारामतीच्या सुशीला व रुचिता क्षीरसागर यांचे प्रेरणादायी छायाचित्र केंद्रीय सचिवांना भेट देण्यात आले. केंद्रीय शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने असाक्षर व नवसाक्षरांसाठी दोनदिवसीय ‘उल्लास मेला’चे आयोजन केले होते.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, शिक्षण सचिव संजय कुमार, कौशल्यविकास सचिव अतुलकुमार तिवारी, एनसीईआरटीचे संचालक दिनेशकुमार सकलानी, शिक्षण सहसचिव अर्चना अवस्थी, राष्ट्रीय साक्षरता केंद्राच्या प्रमुख उषा शर्मा यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 6) मेळाव्याचे उद्घाटन झाले. बुधवारी या मेळाव्याचा समारोप झाला. योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी सूचित केल्याप्रमाणे अमरावती व गडचिरोली या जिल्ह्यांतील प्रत्येकी एक असाक्षर व एक स्वयंसेवक यांना या मेळाव्यासाठी प्रत्यक्ष पाठविण्यात आले होते.

योजना शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर, सहायक योजना अधिकारी विराज खराटे, एससीईआरटी
येथील राज्य साक्षरता केंद्रप्रमुख डॉ. गीतांजली बोरुडे, अधिव्याख्याता पंढरीनाथ जाधव, रत्नागिरी येथील विशेष निमंत्रित अनन्या चव्हाण व तिचे पालक संतोष चव्हाण, अमरावती येथील असाक्षर देविदास जिकर व स्वयंसेवक नागसेन रामटेके, गडचिरोली येथील असाक्षर रमेश सोनटक्के व स्वयंसेवक नंदकुमार मसराम, कोल्हापूरच्या कला पथकातील प्रा. तुकाराम कुंभार, शाहीर डॉ. आझाद नायकवडी, दशरथ कुंभार, उत्तम वाइंगडे, प्रभाकर लोखंडे, दशरथ पुजारी, रामदास देसाई, स्नेहलता पाटील, मायावती सोनटक्के, रूपाली चोथे यांचा महाराष्ट्राच्या पथकात समावेश होता.

छायाचित्रांची भेट
मणक्याच्या आजाराने त्रस्त असलेल्या व प्रत्यक्ष साक्षरता वर्गात न जाता घरीच साक्षरता वर्ग सुरू असलेल्या बारामती येथील 72 वर्षीय सुशीला क्षीरसागर आणि त्यांची नात रुचिता क्षीरसागर यांचे प्रेरणादायी छायाचित्र केंद्रीय शिक्षण सचिव संजय कुमार यांना, तर चिंचणी-सातारा येथील बबई मस्कर या 76 वर्षीय महिलेचे साक्षरता वर्गातील पहिल्या दिवसाचे छायाचित्र सहसचिव अर्चना अवस्थी यांना समारोप कार्यक्रमात भेट देण्यात आले.

Back to top button