डॉ. अमोल कोल्हे, प्रशांत जगताप यांना साथ द्या : जयंत पाटील | पुढारी

डॉ. अमोल कोल्हे, प्रशांत जगताप यांना साथ द्या : जयंत पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यात समस्या खूप आहेत. त्या सोडविण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे यांना तर हडपसर विधानसभा मतदारसंघात प्रशांत जगताप यांच्या मागे उभे राहून त्यांना साथ द्या, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जणू त्यांच्या उमेदवारीवरच शिक्कामोर्तब केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने (शरदचंद्र पवार) हडपसर विधानसभा मतदारसंघाचा विजय निश्चित मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या वेळी पाटील बोलत होते. मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, माजी आमदार जयदेव गायकवाड, प्रकाश म्हस्के, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, माजी उपमहापौर नीलेश मगर, प्रवीण तुपे आदी पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी पाटील म्हणाले, देशाच्या अर्थव्यवस्थेसमोर अनेक संकटे उभी ठाकली असून, बेरोजगारी खूप वाढली आहे. गरिबांना जगणे मुश्कील झाले आहे. महाराष्ट्राबाबत आता बोलण्यासारखे काहीच राहिले नाही. आपले राज्य आता बिहारच झाले आहे, अशी घणाघाती टीकाही पाटील यांनी केली. पाटील म्हणाले, राज्यातील सत्ता टिकविण्यासाठी सत्तेत असलेले सरकार आमदारांच्या पुढे शरण गेले आहे. एका आमदाराने भर पोलिस चौकीत गोळीबार केला, तरी त्याच्यावर कोणत्याही प्रकारची निलंबनाची कारवाई केली नाही, हे चित्र अत्यंत विदारक आहे. सत्ताधारी पक्षांच्या धमक्यांना आपण घाबरायची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. भविष्यात आपल्या देशाचा श्रीलंका होण्यास वेळ लागणार नाही. राज्यात सध्या सुरू असलेली स्थिती अतिशय भयानक आहे. एका एका पक्षाचे तुकडे तुकडे यांनी केले आहेत, असे भाजपचे नाव न घेता त्यांनी टीका केली. या वेळी प्रशांत जगताप, मेहबूब शेख यांनीही मनोगत व्यक्त केले.

तयारीला लागा

लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागा, संघटना बांधा, संघटना तळागाळात पोहोचवा. आपले शिरूरचे खासदार
डॉ. अमोल कोल्हे यांचे राम मंदिरांच्या पायर्‍या चढताना काय काय आठवलं, याची एक कविता लोकसभेत सादर केली. हे भाषण सगळीकडे व्हायरल झालं. आपल्या लोकांची कामं जनतेपर्यंत पोहोचवा, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

बूथ कमिट्या सक्षम करण्याशिवाय पर्याय नाही

बूथ कमिट्यावर काम करा. राजकीय दुकानं आता फार झालेली आहेत. थेट स्वयंपाक घरांपर्यंत प्रचार करणार्‍या दोन- चार महिला तरी तुमच्या बूथ कमिटीत पाहिजेत. कार्यकर्त्यांचीही पळवापळवी होईल म्हणून काही जण बूथ कमिट्याच जाहीर करत नाहीत, हे बरोबर नाही. निवडणूक जिंकायची असेल तर बूथ कमिट्या सक्षम करण्याशिवाय पर्याय नाही, असही जयंत पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button