नवी सांगवीतील साई चौक दिव्यांनी उजळला; नागरिकांतून समाधान व्यक्त | पुढारी

नवी सांगवीतील साई चौक दिव्यांनी उजळला; नागरिकांतून समाधान व्यक्त

नवी सांगवी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या ‘ह’ क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत विद्युत विभागाकडून साई चौक येथे पथ दिव्यांचे 15 खांब उभारण्यात आले आहेत. त्यामुळे येथील साई चौक परिसर रात्रीच्या वेळी पथ दिव्यांमुळे उजळून निघत आहे. परिसरात प्रकाश पडत असल्याने येथील परिसरातील नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. साई चौकाकडून इंद्रप्रस्थ रोडच्या दिशेने जाताना उजव्या बाजूला रस्त्याकडेला पालिकेकडून ओपन जिम, जॉगिंग ट्रॅक तयार करण्यात आला होता; मात्र पहाटेच्या सुमारास व रात्रीच्या वेळी परिसरात अंधार असल्याने व्यायामप्रेमींना; तसेच फेरफटका मारण्यासाठी येणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना गैरसोयीचे ठरत होते.

याकडे गेली काही दिवस प्रशासनाचे दुर्लक्ष होते. या वेळी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून तक्रार येताच विद्युत विभागाच्या संबंधित अधिकार्‍यांकडून तक्रारीची दखल घेत नुकतेच नव्याने सुमारे पंधरा पथदिवे त्वरित उभारण्यात आले. येथील अंधार नष्ट होऊन प्रकाश पडत असल्याने काहीअंशी का होईना प्रेमी युगुलांवर, मद्यपींवर आळा बसू शकेल. पहाटेच्या वेळी सायंकाळच्या वेळी व्यायाम प्रेमींनी, फेरफटका मारण्यासाठी येत असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी उजेडाचा फायदा होणार असल्याने नागरिकांनी विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांचे याप्रसंगी आभार मानले आहे.

येथील उच्चभ्रू परिसरात वास्तव्य करीत असलेल्या सोसायटी समोरच रस्त्याच्या कडेला अंधार पडत होता. सायंकाळी, रात्रीच्या सुमारास, दिवसा रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या वाहनांच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेत प्रेमीयुगुले चाळे करत. मद्यपींचा वावर होताना पहावयास मिळत होता. त्यामुळे सोसायटीतील नागरिकांना, रस्त्याच्या कडेने पायी चालणार्‍या नागरिकांना, वाहन चालकांना, व्यायामप्रेमींना याचा नाहक त्रास सहन करावा लागत होता. वेळोवेळी हाकेच्या अंतरावर असणार्‍या पोलिस स्टेशनमधील पोलिसांकडून अशांवर कारवाई होत होती. मात्र पुन्हा काही वेळाने जैसे थे परिस्थिती होत असे.

नवी सांगवी साई चौक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मैदानाला लागून रस्त्याच्या कडेच्या जागेत ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा व फिरण्यासाठी सुरक्षित वॅाकिंग प्लाझा तयार करण्यात आला होता. त्याठिकाणी पहाटे चार ते सकाळी आठ व संध्याकाळी चार ते रात्री साडेअकरा या वेळेत ज्येष्ठ नागरिकांसह महिला, मुले फेरफटका मारायला येत असतात. या ठिकाणी पुरेशी प्रकाश व्यवस्था करण्यात यावी, यासाठी नागरिकांतून वारंवार मागणी केली जात होती. महापालिकेचे आयुक्त व सहशहर अभियंता विद्युत यांच्या मार्गदर्शनाखाली निविदा मागवून प्रकाश व्यवस्था करण्यात आली आहे.

– दिलीप धुमाळ, कार्यकारी अभियंता, विद्युत विभाग

येथील परिसरात अंधार पडत असल्याची तक्रार आल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार डेकोरेटिव्ह स्ट्रीट लाईटचे 15 पोल उभारून वीज सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे परिसरात प्रकाश पडत आहे.

– जितेंद्र आहिरे, कनिष्ठ अभियंता, विद्युत विभाग

हेही वाचा

Back to top button