ताथवडे अतिउच्चदाब उपकेंद्राला मंजुरी | पुढारी

ताथवडे अतिउच्चदाब उपकेंद्राला मंजुरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विजेची वाढती मागणी तसेच दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी ताथवडेतील ’यशदा’च्या जागेवर प्रस्तावित अतिउच्चदाबाचे 220/20 केव्ही उपकेंद्र उभारण्यास महावितरणकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा लाभ ताथवडे, पुनावळे, चिंचवड, किवळे, वाकड व हिंजवडी परिसरातील सुमारे 85 हजार वीजग्राहकांना होणार आहे. अतिउच्चदाबाचे हे नवीन उपकेंद्र उभारण्याची कार्यवाही महापारेषणकडून करण्यात येणार आहे.

पुणे परिमंडलातील भविष्यातील वीजपुरवठ्याची स्थिती लक्षात घेता महावितरणकडून आतापर्यंत चर्‍होलीतील 220/33/22 केव्ही प्राईड वर्ल्ड सिटी, मोशीतील 220/22 केव्ही सफारी पार्क हे दोन नवीन अतिउच्च्दाब उपकेंद्र उभारण्यास तसेच सेन्चुरी एन्का उपकेंद्राची 100 एमव्हीएने क्षमतावाढ करण्यास मंजुरी मिळाली आहे. आता ताथवडेतील तिसरे अतिउच्चदाब उपकेंद्र देखील मंजूर झाले आहे.
महावितरणच्या पिंपरी विभाग अंतर्गत हिंजवडी, ताथवडे, पुनावळे, किवळे, वाकड व चिंचवड तसेच भोसरी विभागातील रावेत व आकुर्डी परिसरातील सुमारे 2 लाख 29 हजार 700 वीजग्राहकांना महापारेषणच्या 220/22 केव्ही चिंचवड व 220/22 केव्ही हिंजवडी अतिउच्चदाब उपकेद्रांद्वारे वीजपुरवठा केला जातो.

ताथवडेतील अतिउच्चदाबाच्या नवीन 220/22 केव्ही यशदा उपकेंद्रातून 22 केव्ही क्षमतेच्या 10 नवीन वीजवाहिन्या निघतील तर 50 एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर लावण्यात येतील. या 10 वीजवाहिन्यांद्वारे ताथवडे, पुनावळे, चिंचवड, किवळे, वाकड व हिंजवडी परिसरातील सुमारे 85 हजार ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येईल. तसेच, हिंजवडी व चिंचवड अतिउच्चदाबाच्या उपकेंद्रावरील वीजभार कमी होणार असल्याने एकूण सुमारे 2 लाख 29 हजार 700 वीजग्राहकांना आणखी दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध होईल. काही कारणांमुळे वीज खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था उपलब्ध होईल.

हेही वाचा

Back to top button