निगडी ते रावेत उड्डाणपूल वाहतुकीस खुला न केल्यास आंदोलनाचा इशारा | पुढारी

निगडी ते रावेत उड्डाणपूल वाहतुकीस खुला न केल्यास आंदोलनाचा इशारा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : निगडी येथील बीआरटीएस स्थानक ते रावेत उड्डाणपूल या बीआरटीएस मार्गाचे काम तब्बल आठ वर्षानंतर पूर्ण झाले आहे. नेतेमंडळीची वेळ मिळत नसल्याने तो रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आलेला नाही. तो मार्ग वाहतुकीसाठी आठवड्याभरात खुला न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिला आहे.

‘निगडी-रावेत उड्डाण पुलाचा मुहूर्त हुकला’ असे ठळक वृत्त ‘पुढारी’ने 29 जानेवारीला प्रसिद्ध केले होते. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांची 26 जानेवारीची तारीख रद्द झाल्याने पुलाचे उद्घाटन केले नाही. जागा ताब्यात न घेता महापालिकेने थेट बीआरटी मार्गाचे काम सुरू केले. संंबंधित शेतकरी न्यायालयात गेल्याने, जागा हस्तांतरणात तब्बल 8 वर्षांचा कालावधी गेला.
या 45 मीटर रुंद मार्गाचे काम जानेवारी महिन्यात पूर्ण झाले आहे.

त्यामुळे भक्ती-शक्ती चौकापासून रावेतच्या मुकाई चौकापर्यंत केवळ दहा मिनिटात पोहोचता येते. या मार्गामुळे वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. नेतेमंडळींची प्रतीक्षा न करता आयुक्तांनी हा मार्ग तातडीने वाहतुकीस खुला करावा. अन्यथा रास्ता रोको
आंदोलन करण्याचा इशारा काळभोर यांनी दिला आहे.

हेही वाचा

Back to top button