दिव्यांग क्रीडा स्पर्धेत 421 जणांचा सहभाग : आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन | पुढारी

दिव्यांग क्रीडा स्पर्धेत 421 जणांचा सहभाग : आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने दिव्यांग मुला- मुलींच्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या जिल्हास्तरीय दिव्यांग मुला- मुलींच्या क्रीडा स्पर्धेचे हवेत फुगे सोडून मंगळवारी (दि.6) दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रवीण कोरगंटीवार आदी उपस्थित होते. दिव्यांगाच्या विशेष शाळा, कर्मशाळामधील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना खेळात संधी मिळावी म्हणून जिल्ह्यातील शासकीय मान्यता प्राप्त अनुदानित व कायमस्वरूपी विनाअनुदानित दिव्यांग विशेष शाळा, कर्मशाळेतील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली आहे.

दिव्यांग शालेय विद्यार्थ्यांनी संचलन करून उपस्थितांना मानवंदना दिली. मनश्री राऊत या दिव्यांग मुलींच्या गायनाने व अंध मुलांची शाळा, कोरेगाव पार्कमधील दिव्यांग मुलांच्या मल्लखांबाच्या प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत मतिमंद व अंध प्रवर्गातील अनुक्रमे 28 आणि 5 शाळांनी सहभाग नोंदविला असून 421 दिव्यांग स्पर्धकांनी भाग घेतला.
सदर स्पर्धेमध्ये अंध व मतिमंद या प्रवर्गातील 8 ते 12, 12 ते 16, 17 ते 21 व 22 ते 25 या वयोगटानुसार 50 मीटर धावणे, लांब उडी, 100 मीटर धावणे, गोळा फेक, 200 मीटर धावणे, 400 मीटर धावणे, सॉफ्ट बॉल, उभे राहून लांब उडी मारणे, परत येऊन लांबउडी मारणे या स्पर्धा घेण्यात आल्या. सूत्रसंचालन अशिष जर्‍हाड यांनी केले.

पाबळ निवासी शाळा विजेती

मतिमंद प्रवर्गातील शाळा गटातून मतिमंद मुलांची निवासी शाळा, पाबळ तर कार्यशाळा गटातून कामायनी उद्योग केंद्र, गोखलेनगर तसेच अंध प्रवर्गातील शाळा गटातून जागृती अंधमुलींची शाळा, आळंदी या शाळांनी सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले.

हेही वाचा

Back to top button