निघोटवाडी येथील गॅस शवदाहिनी वापराविना धूळ खात | पुढारी

निघोटवाडी येथील गॅस शवदाहिनी वापराविना धूळ खात

मंचर : पुढारी वृत्तसेवा :  निघोटवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीद्वारे उभारण्यात आलेली गॅस शवदाहिनी एक वर्षापासून वापराविना धूळ खात पडून आहे. यासाठीचा लाखो रुपयांचा खर्च वाया गेला असून, ही शवदाहिनी वापरात नसल्याने येथे बसविलेले काही साहित्य चोरीला गेले आहे. मंचर, निघोटवाडी, शेवाळवाडी येथील ग्रामस्थांसाठी तपनेश्वर स्मशानभूमीमध्ये गॅस शवदाहिनीसाठी सन 2021-22 मध्ये निविदा मंजूर झाली. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जिल्हा नियोजन मंडळातून 75 लाख रुपये आणि माजी जिल्हा परिषद सदस्य अरुणाताई थोरात यांनी 15 लाख रुपयांचा निधी यासाठी मंजूर करून आणला होता. हे काम पूर्ण होऊन एक वर्ष झाले असून, यासाठी 90 लाख रुपयांचा निधी खर्ची पडला आहे.

या गॅस शवदाहिनीची देखभाल कोणी करायची? यासाठी मंचर नगरपंचायत आणि निघोटवाडी ग्रामपंचायत यांच्यामध्ये समन्वय नाही. त्यामुळे ही गॅस शवदाहिनी चालू झाली नसल्याची चर्चा आहे. दरम्यान, या ठिकाणी बांधण्यात आलेल्या टॉयलेटसाठी बसविलेल्या बेसिन व दरवाजाची तोडफोड करण्यात आली आहे. येथील नोझल व नळ चोरीला गेल्याचे मंचर नळ पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले यांनी सांगितले. सध्या तेथे दारुडे, गांजा पिणारे, भटकी कुत्री आणि भिकार्‍यांचा वावर आहे. या ठिकाणी प्रशिक्षित कामगार नेमून मृत्यूच्या नोंदीचे कार्यालय उघडावे. मंचर नगरपंचायतीने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर मोफत अंत्यसंस्कार करावेत आणि ही गॅस शवदाहिनी लवकरात लवकर चालू करावी, अशी मागणी वसंतराव बाणखेले यांनी केली आहे.

निघोटवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने गॅस शवदाहिनी उभारण्यात आली आहे. त्याचा मालकी हक्क जिल्हा परिषदेकडे असल्याने त्यांना पत्र देऊन ग्रामसभेच्या ठरावाची प्रत पाठवली जाणार आहे. त्यानंतर त्याच्या आदेशानुसार नगरपंचायतीकडे देण्यासाठी कार्यवाही केली
जाणार आहे.
                                                     – नवनाथ निघोट, सरपंच, निघोटवाडी

मंचर नगरपंचायतीकडे गॅस शवदाहिनीचे हस्तांतरण झाल्यानंतर लगेच कार्यवाही केली जाईल.
                                                                   – गोविंद जाधव, मुख्याधिकारी,

Back to top button