घोड नदी मृतदेह प्रकरण : चुलतभाऊ आणि काकानेच केला खून | पुढारी

घोड नदी मृतदेह प्रकरण : चुलतभाऊ आणि काकानेच केला खून

शिरूर : पुढारी वृत्तसेवा :  शिरूर शहरालगत असलेल्या घोड नदीत सहा दिवसांपूर्वी आढळलेल्या बेवारस मृतदेहाचा उलगडा करण्यात शिरूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. चुलत भाऊ आणि काकानेच हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. चुलतभाऊ अजिनाथ गोकुळ विघ्ने (वय 26), काका पांडुरंग अर्जुन विघ्ने (वय 50, दोघेही रा. आनंदगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड) आणि आतेभाऊ गणेश प्रभाकर नागरगोजे (रा. निंबळक, जि. अहमदनगर) अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. खून झालेल्या युवकाचे नाव कृष्णा गोकुळ विघ्ने (वय 32, रा. आनंदगाव, ता. शिरूर कासार, जि. बीड) असे आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरूर येथील पाचर्णेमळा येथील घोड नदीत दि. 31 जानेवारी रोजी 30 ते 35 वर्षे वयाच्या अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. त्यास मारहाण करून काळ्या, लाल व पांढऱ्या दोरीने हातापासून पायापर्यंत ठिकठिकाणी बांधून घोड नदीत टाकून देण्यात आले होते. याबाबत दि. 1 फेब—ुवारी रोजी शिरूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मोठ्या प्रयत्नानंतर पोलिसांनी मयताचे नाव कृष्णा गोकुळ विघ्ने असे निष्पन्न केले.

दरम्यान या घटनेचा तपास करताना मयत कृष्णा यास दारू पिण्याचे व्यसन होते. त्यामुळे तो दारूच्या नशेमध्ये नातेवाईकांना शिवीगाळ तसेच मारहाण करीत होता. यासोबत यातील संशयितांसोबत जमिनीच्या विक्रीच्या पैशाचे वाटपावरून त्याचा वाद होता. त्यामुळे यातील संशयितांनी कृष्णा यास व्यसनमुक्ती केंद्रात नेतो, असा बहाणा करून दांडक्याने मारहाण करून तसेच दोरीने बांधून त्यास आनंदगाव (ता. शिरूर कासार, जि. बीड) येथून गाडीमध्ये टाकले. त्यानंतर कृष्णा यास या तिघांनी 17 पुणे-अहमदनगर महामार्गावरील शिरूरच्या कमान पुलावरून घोड नदीमध्ये जिवंत टाकून दिले, यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान मयत याची ओळख पटल्यानंतर अजिनाथ गोकुळ विघ्ने, पांडुरंग अर्जुन विघ्ने आणि गणेश प्रभाकर नागरगोजे यांना ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव करीत आहेत. अटक केलेल्या तिघांनाही न्यायालयाने दि. 10 फेब—ुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक (पुणे विभाग) रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी (शिरूर उपविभाग) यशवंत गवारी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूरचे पोलिस निरीक्षक जोतिराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप यादव, पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील, पोलिस हवालदार अरुण उबाळे, परशुराम सांगळे, पोलिस नाईक नाथसाहेब जगताप, पोलिस अंमलदार रघुनाथ हाळनोर, नितेश थोरात, विकी यादव, संतोष साळुंखे तसेच स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांचेकडील पोलिस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंधारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके यांनी केली.

Back to top button