अबब… एका गुंठ्यात 78 प्रकारचा विषमुक्त भाजीपाला

अबब… एका गुंठ्यात 78 प्रकारचा विषमुक्त भाजीपाला
Published on
Updated on

शिवनेरी : पाच व्यक्तींच्या एका कुटुबांची गरज भागेल, आठ दिवस दररोज सकाळ, संध्याकाळ वेगळी भाजी खायला मिळेल आणि शरीराला आवश्यक असलेली सर्व पोषणमूल्येदेखील मिळतील यासाठी केवळ एका गुंठ्यात तब्बल 78 प्रकारचा विषमुक्त भाजीपाला देणारे खास मॉडेल नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रांने विकसित केले आहे. केवळ ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबासाठी नाही तर शहरी भागातील सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्यांसाठी देखील हाच भाजीपाला टेरेस, छोट्या बाल्कनीत देखील कसा घेता येईल, याचे देखील मॉडेल येथे बनविण्यात आले आहे. कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांसाठी एका एकरमध्ये कुटुंबाच्या सर्व गरजा भागवून दर आठवड्याला हमखास भरघोस उत्पन्न देणारे मॉडेलदेखील बनविण्यात आले आहे.

मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असलेला भाजीपाला दररोजच्या जेवणात येऊ लागल्याने शहरी लोकांसोबत आता ग्रामीण भागातील लहान-मोठा शेतकरी अनेक भयानक आजारांना बळी पडू लागला आहे. याशिवाय दिवसेंदिवस शेतजमीन देखील कमी होत चालली आहे. या पाश्र्वभूमीवरच नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कमीत कमी जागेत एका कुटुंबाची सर्व गरज लक्षात घेऊन केवळ एका गुंठ्यात 78 प्रकारचा भाजीपाला, यात आठ प्रकारच्या पालेभाज्या, आठ प्रकारच्या फळ भाज्या, आठ प्रकारच्या वेलवर्गीय भाज्या, आठ प्रकारचा कंद भाजीपाला, विविध प्रकारच्या सॅलड भाजीपाला घेता येऊ शकेल असे 'अन्नपूर्णा किचन गार्डन' मॉडेल विकसित केले आहे. दुसरीकडे शहरी भागासाठी व्हर्टिकल किचन गार्डन, टेरेस किचन गार्डन, बाल्कनी किचन गार्डन ही मॉडेल विकसित केली आहेत.

याबाबत नारायणगाव केव्हीकेच्या गृहविज्ञान विषयतज्ज्ञ निवेदिता शेटे यांनी सांगितले, नारायणगाव केव्हीकेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी स्वतःचे कुटुंब व काही विक्रीसाठीदेखील विषमुक्त व सर्वाधिक पोषण मूल्य असलेले कडधान्य, पालेभाज्या, फळभाज्या, विविध सीझनल फळे उपलब्ध व्हावीत यासाठी मॉडेल विकसित केले आहे. यामध्ये एक एकरमध्ये पोषणमूल्य आधारित शेती मॉडेलसह, एक गुंठ्याचे अन्नपूर्णा किचन गार्डन, व्हर्टिकल किचन गार्डन, टेरेस किचन गार्डन, बाल्कनी किचन गार्डन यांचा समावेश असून, येत्या 8 ते 11 फेब—ुवारीदरम्यान ग्लोबल कृषि विज्ञान प्रदर्शनात ही सर्व मॉडेल शेतकरी व सर्वसामान्य कुटुंबांना प्रत्यक्ष पाहता येणार आहेत.

नैसर्गिक शेतीवर विशेष भर
यंदाच्या ग्लोबल कृषी विज्ञान प्रदर्शनात नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने नैसर्गिक, सेंद्रीय शेतीवर देखील विशेष भर दिला आहे. यामध्ये शेतकर्‍यांना रासायनिक शेतीकडून पुन्हा एकदा नैसर्गिक व पारंपरिक शेतीकडे वळवण्यासाठी
डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानअंतर्गत नैसर्गिक शेतीचे प्रात्यक्षिक व शेतीसाठी लागणार्‍या विविध नैसर्गिक निविष्ठा निर्मिती प्रकल्प या प्रदर्शनात पहात येणार असल्याचे नारायणगाव कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ योगेश यादव यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news