खोर परिसराला पाणीटंचाईच्या झळा ; पिके जगविण्यासाठी धडपड | पुढारी

खोर परिसराला पाणीटंचाईच्या झळा ; पिके जगविण्यासाठी धडपड

खोर : पुढारी वृत्तसेवा :  दौंडच्या ग्रामीण भागातील गावांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये खोर परिसराचा समावेश आहे. उन्हाळा सुरू झाला की दौंड तालुक्याच्या दक्षिण भागाला पाणीटंचाई उग्र रूप धारण करत असते. परिणामी याचा मोठा फटका हा शेतकरी वर्गाला बसतो आहे.

दौंड तालुक्याच्या दक्षिण भागामधील असलेल्या खोर, देऊळगावगाडा, नारायण बेट, माळवाडी, पडवी या गावांना उन्हाळ्याच्या कालावधीत पाणीटंचाईचा मोठा फटका बसत असतो. सद्य:स्थितीत खोर परिसरात पाणी टंचाईची समस्या भेडसावण्यास सुरुवात झाली असून या परिसरातील ओढे, नाले, विहिरी, तलाव हे पूर्णतः आटले आहेत. या भागात अंजीराच्या बागा मोठ्या प्रमाणावर आहेत. मात्र सध्या पाणी कमी पडले असल्याने अंजीराचा हंगाम धोक्यात आला आहे. अंजीराचा खट्टा बहार हा हंगाम संपला असून यापुढे फेब—ुवारी ते मे दरम्यान अंजीराचा मिठा बहार घेतला जातो; मात्र ऐन हंगामाच्या कालावधीतच पाणी संपुष्टात आल्याने शेतकरी वर्ग चिंतेत सापडला गेला आहे. या भागातील शेतकर्‍यांनी जनाई-उपसा योजनेतून पद्मावती व पुरंदर जलसिंचन उपसा योजनेतून डोंबेवाडी पाझर तलावात आवर्तन सोडण्याची मागणी केली आहे. सध्या अंजीर बागेला पाणी कमी पडल्याने अंजीर उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यापुढील मिठा बहाराचा हंगाम पूर्ण होण्यावर पाण्याअभावी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

बंदिस्त पाईपलाईन योजना रखडली
पुरंदर उपसा योजनेतून खोरच्या डोंबेवाडी तलावापर्यंत बंदिस्त पाईपलाईन योजना करण्याच्या संदर्भात हालचाली सुरू झाल्या. अनेकदा याबाबत सिंचन विभाग, लोकप्रतिनिधी यांच्या बैठका पार पडल्या. त्यानंतर पाईपलाईनसाठी सर्व्हे करण्यात आला. त्यांनतर याबाबतच्या फाईल मंत्रालयात पाठविण्यात आल्या. मात्र या बंदिस्त पाईपलाईन योजनेचे पुढे नेमके काय झाले हे कळण्यास मार्ग नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ही पाईपलाईन योजना पूर्ण झाली तर भविष्यातील खोर व देऊळगाव गाडा परिसराची कायमस्वरूपाची उन्हाळ्याच्या कालावधीतील पाणीटंचाई मिटणार आहे.

वरकुटे खुर्द तलावात अल्प पाणीसाठा

वरकुटे खुर्द (ता. इंदापूर) पाझर तलावात सध्या अत्यंत अल्प पाणीसाठा शिल्लक असून पिण्याच्या पाण्याची तीव— टंचाई गावांमध्ये जाणवू लागली आहे. त्यामुळे पाझर तलावात निरा डावा कालव्याच्या सुरू असलेल्या आवर्तनातून पाणी सोडावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच बापूराव शेंडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निमगाव केतकी येथील जलसंपदा विभागास दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावानजीक असलेल्या पाझर तलावात अत्यंत कमी पाणीसाठा राहिला असून वरकुटे गावाला पाणीपुरवठा करणारी विहीरदेखील या तलावाजवळ असून त्या विहिरीतही पाणी कमी झाले आहे. वीर भाटघर धरणातून निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू असून त्यातून फाट्याद्वारे पाणी तलावात सोडले तर ते पाणी पाझरून विहिरीमध्ये उतरेल व पाण्याची टंचाई जाणवणार नाही. त्यामुळे तातडीने तलावात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी सरपंच शेंडे यांनी केली आहे.

Back to top button