नव्या पोलिस अधीक्षकांपुढे सायबर गुन्हेगारीचे आव्हान | पुढारी

नव्या पोलिस अधीक्षकांपुढे सायबर गुन्हेगारीचे आव्हान

यवत : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांची बदली झाल्यानंतर नव्याने पुणे ग्रामीण पोलिस दलात अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या पंकज देशमुख यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जिल्ह्यात वाढत असलेली सायबर गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान असणार आहे. गेल्या दोन-तीन वर्षांत जिल्ह्यातील ग्रामीण भागात सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गुन्हे घडू लागेल आहेत. अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे की चर्चा करून वाद मिटवावेत, असा मोठा प्रश्न स्थानिक पोलिस ठाण्यांचे अधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांच्यासमोर उभा राहू लागला आहे.

गेल्या वर्षभरात पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी जिल्ह्यातील विविध भागांत अशा घटना घडल्यानंतर स्वतः तेथे उपस्थित राहत स्थानिक पोलिस ठाण्यांचे अधिकारी यांच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकार्‍यांची आणि कर्मचार्‍यांची मोठी मदत झाली होती.

स्थानिक पोलिस ठाण्याइतकाच जिल्हाभरात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा संपर्क आहे. हुल्लडबाजी करणारे काही तरुण आपण किती धर्म आणि जातिअभिमानी आहोत, हे दाखविण्यासाठी दुसर्‍या जाती-धर्माबद्दल चुकीच्या पोस्ट आणि व्हिडीओ व्हायरल करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अशा स्वरूपाचे गुन्हे घडूच नयेत, म्हणून सायबर कायदा प्रभावीपणे राबविण्याची गरज आता निर्माण झाली आहे. शिवाय. यंदाचे संपूर्ण वर्ष लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत जाणार असल्याने नव्याने रुजू झालेले पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांना जिल्ह्यात काम करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा विचार करता राज्यातील सर्वाधिक चुरशीचा लोकसभा मतदारसंघ म्हणून यंदा बारामती लोकसभेची निवडणूक ठरू शकते. त्यामुळे या वेळी लोकसभा निवडणुकीत जिल्हा पोलिस दलावर मोठी जबाबदारी असणार आहे.

सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्टची डोकेदुखी
मोबाईलच्या माध्यमातून विविध जाती आणि धर्मांविरोधात रोष निर्माण करणारी विधाने व्हायरल केली जातात. याबाबत तीव— इच्छा असूनही काहीवेळा पोलिसांना कडक भूमिका घेता येत नाही. कारण, महापुरुषांच्या जयंती किंवा सण- उत्सव या वेळीच समाजकंटक वादग्रस्त मेसेज, व्हिडीओ आणि पोस्ट व्हायरल करीत असतात. सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट समाजासह पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. अशावेळी कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांना कठोर परिश्रम घ्यावे लागतात.

यूट्यूबर मिरवताहेत पत्रकार म्हणून
यूट्यूबर असलेले अनेक जण सध्या पत्रकार म्हणून मिरवताहेत. तोसुध्दा एक मोठा गंभीर प्रश्न सध्या उभा राहिला आहे. या लोकांनी प्रशासनाच्या नाकी नऊ आणले आहे. अनेक अधिकारी व कर्मचारी त्यांच्या दबावाला बळी पडत आहेत. जिल्ह्यात सर्वत्र हा प्रकार सुरू असून, या प्रकाराला आळा घालण्यासाठी कठोर उपायांची गरज आहे.

 

Back to top button