Crime news : सविंदणेत हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी | पुढारी

Crime news : सविंदणेत हत्याराचा धाक दाखवत जबरी चोरी

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा :  सविंदणे (ता. शिरूर) येथील पूर्व नरवडे मळ्यात मंगळवारी (दि. 6) पहाटेच्या सुमारास पाच अज्ञात चोरट्यांनी वयोवृध्द दाम्पत्यास मारहाण करत सुवर्ण अलंकारासह रोख रक्कम लुटून नेली. या वेळी चोरटे एक मोटारसायकल घेऊन पसार झाले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सविंदणे येथील पूर्व नरवडे मळ्यात संभाजी नरवडे दाम्पत्य राहतात. त्यांच्या घराचा दरवाजा उचकटून संभाजी नरवडे (वय 67) व त्यांच्या पत्नी बबूबाई नरवडे (वय 60) यांना जबर मारहाण करत बबूबाई यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, मोहन माळ, जोडवी, कानातील कर्णफुले असा अंदाजे 10 तोळ्याचा ऐवज आणि मोबाईल चोरट्यांनी पळविला. त्यांच्या घरातील साहित्याची उचकापाचक करून रोख तीन हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले.

नरवडे यांच्या घराच्या जवळपास लोकवस्ती नाही. मुलगा बाहेरगावी नोकरीसाठी वास्तव्यास आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे हे वृद्ध दाम्पत्य अत्यंत भयभीत झाले असून मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने नागरिकांनी त्यांना उपचारासाठी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
दरम्यान स्थानिक ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी कवठे येमाई रस्त्यालगत राहणारे मोहन नरवडे यांच्या घरामागील दोन खिडक्या काढून घरात शिरण्याचाही प्रयत्न केला पण तो अयशस्वी झाला. तर नजीकच्या संजय नरवडे यांची शाईन दुचाकी घेऊन चोरटे पसार झाले.

शेतीपयोगी साहित्य चोरीनंतर आता घरफोडी
सविंदणे गावच्या परिसरात विद्युत रोहित्र, विद्युत मोटारी चोरीचे सत्र खूप दिवसांपासून सुरूच असून आता घरफोड्या सुरू झाल्या आहेत. पोलिस प्रशासनाने याचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.

घडलेली घटना अतिशय गंभीर स्वरूपाची असून या घटनेचा लवकरात लवकर छडा लावून यातील आरोपी गजाआड करू.
                                                                      – ज्योतीराम गुंजवटे,  पोलिस

Back to top button