हुंडा अन् वंशाच्या दिव्याचा हव्यास जाईना; विवाहित महिलांच्या छळात वाढ | पुढारी

हुंडा अन् वंशाच्या दिव्याचा हव्यास जाईना; विवाहित महिलांच्या छळात वाढ

संतोष शिंदे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : हुंडा अन् वंशाच्या दिवा ही बुरसटलेली विचारसरणी समाजात खोलवर रुजली आहे. या दोन कारणांसाठी आजही महिलांचा छळ केला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभर दररोज याप्रकरणी गुन्हे दाखल होत आहेत. मागील वर्षी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेल्या ठाण्यांमध्ये तब्बल 292 गुन्हे दाखल आहेत.

मूल न होण्यास पतीही जबाबदार

मूल होत नसल्यानेदेखील विवाहितांचा छळ केल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे, महिला सेलकडे येतात. मात्र, मूल होत नसल्यास केवळ स्त्री जबाबदार नसते, तर पुरुषामध्येही काही कारणे असू शकतात. तज्ज्ञांच्या मतानुसार, मूल होत नसल्यास 35 टक्के कारणे महिलेशी संबंधित असतात. 30 टक्के कारणे पुरुषांशी संबंधित असतात. 20 टक्के दोघांमध्ये दोष असतो व 15 टक्के दाम्पत्यांमध्ये कारण समजत नाही. मुलगा किंवा मुलगी होणे, हे पूर्णपणे पतीवर अवलंबून असते. यामध्ये पत्नीची काहीही चूक नसते.

भोंदूबाबाने केले पाच बहिणींचे शोषण

मुलगा होण्यासाठी पूजापाठ करण्याच्या बहाण्याने एका भोंदू बाबाने पाच बहिणींचे लैंगिक शोषण केले. हा धक्कादायक प्रकार पिंपरी येथे उघडकीस आला होता. या घटनेमुळे एकविसाव्या शतकातही वंशाच्या दिव्याचा हव्यास पुन्हा एकदा समोर आला.
उदा. मुलगी झाल्याच्या कारणावरून सासरच्या लोकांनी विवाहितेचा छळ केल्याने विवाहितेने पिंपरी पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मागील वर्षी उघडकीस आली आहे.

उच्चशिक्षितांचाही सहभाग

हुंडा आणि मुलगा न होण्याच्या कारणामुळे विवाहितेचा छळ करण्यामध्ये अशिक्षितांसोबत उच्चशिक्षितांचाही सहभाग आहे. त्यामुळे याबाबत समाजामध्ये अजूनही जनजागृती करण्याची गरज असल्याचे जाणकार सांगतात.

दाखल गुन्ह्यांपेक्षा पीडितांची संख्या जास्त ?

पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयात विवाहितेच्या छळप्रकरणी एकूण 292 गुन्हे दाखल आहेत. प्रत्यक्षात मात्र यापेक्षा जास्त महिला सासरच्या छळाला बळी पडल्याची शक्यता आहे. ठाण्यात आलेल्या तक्रारी अर्जावरून पोलिस बहुतांश प्रकरणांमध्ये समुपदेशन करतात. तसेच, मूल न होण्याच्या प्रकरणांमध्ये महिला समोर येऊन तक्रार देण्यास धजावत नाहीत.

महिला सेलकडेही तक्रारी

महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये महिला सेल कार्यरत आहे. वेगवेगळ्या प्रकारे महिलांचा छळ होत असल्याच्या तक्रारी दररोज या सेलकडे प्राप्त होतात. यामध्ये हुंडा, मूल न होणे या कारणांसाठी छळ होत असल्याच्यादेखील तक्रारी आहेत.

मुलगा आणि मुलगी हे मनुष्याने निर्माण केलेले भेद आहेत. प्रत्येकात वैशिष्ट्यपूर्ण गुण असतात. त्यामुळे कोणताही लिंगभेद न करता आपण त्यांना समान संधी दिल्या पाहिजेत. पाल्यांनी आयुष्यात चांगले काम करावे, यासाठी आपण त्यांना उद्युक्त केले पाहिजे. मुलींना समानतेने वागवले पाहिजे.

– स्वप्ना गोरे, पोलिस उपायुक्त, पिंपरी

हेही वाचा

Back to top button