रुग्णाचा आभासी अवयव पाठवा, डिजिटल ट्विन निदान करेल | पुढारी

रुग्णाचा आभासी अवयव पाठवा, डिजिटल ट्विन निदान करेल

पुणे : पुढारी वृत्तसेवा : रुग्णाला शरीराच्या ज्या भागात त्रास आहे तो आभासी अवयव (व्हर्च्युअल बॉडी पार्ट) पाठविला तर महासंगणकाच्या साहाय्याने डिजिटल टि्वन नावाचे तंत्रज्ञान आता त्याचे योग्य निदान करेल, असा दावा सी-डॅक संस्थेच्या जीवशास्त्र परिषदेत विदेशी शास्त्रज्ञांनी केला. सी-डॅकच्या (प्रगत संगणक विकास केंद्र) वतीने अक्सलरेटिंग बायोलॉजी या जीवशास्त्रातील अत्याधुनिक संशोधनावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे मंगळवारी उद्घाटन झाले. या वेळी सी-डॅकचे संस्थापक व ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, संस्थेचे महासंचालक ई. मंगेश, आयसर संस्थेचे संचालक डॉ. सुनील भागवत, मिशन डायरेक्टर डॉ. हेमंत दरबारी, परिषदेचे संयोजक डॉ. राजेंद्र जोशी उपस्थित होते.

भगवद्गीतेत अत्याधुनिक तत्त्वज्ञान

उद्घाटनाच्या सत्रात डॉ. विजय भटकर म्हणाले, आम्ही जीवशास्त्र कधी शिकलो नाही. मात्र, आता अभियंत्याला हा विषय शिकावा लागणार आहे. त्यातूनच नवे शोध लागतील. कोविडसारखी परिस्थिती येईल, असे कधीही वाटले नव्हते. पण, शास्त्रज्ञांनी कमी कालावधीत त्यावर लस शोधली. भगवद्गीता हा मोठा ग्रंथ आपल्याकडे आहे. त्यात अत्याधुनिक तत्त्वज्ञान आहे. त्यात या सर्व गोष्टी सापडतात. त्यामुळे तोच खरा मानवतेचा ग्रंथ आहे.

डिजिटल ट्विन तंत्रज्ञान करेल निदान

उद्घाटनानंतरच्या सत्रात डिजिटल टि्वन्स इन बायोलॉजी अँड मेडिसिन यावर परिसंवाद झाला. यात अमेरिकेतील
डॉ. अनिल श्रीवास्तव, डॉ. एरिक स्टालबर्ग, इंग्लंडचे डॉ. क्रेझी मॅजर्क, प्रा. पीटर कोनी, बर्लिन विद्यापीठातून आलेल्या डॉ. प्रियंका बॅनर्जी, स्पेनचे डॉ. मरिनो वाझेक्यू यांचा सहभाग होता. या सर्वांनी डिजिटल टि्वन तंत्रज्ञान मानवी जीवनासह पर्यावरणातील बदलांवर कसे प्रभावी काम करते, ते सांगतिले. प्रा. पीटर कोनी म्हणाले, यापुढे रुग्णाला निदान वेगाने होण्यासाठी जगभरात कुठेही तुमचे आभासी अवयव पाठविता येणे शक्य आहे. समजा हृदयविकाराचा त्रास वाटत असेल तर त्याचे आभासी सॅम्पल तयार करून पाठविले तर डिजिटल तंत्रज्ञानाने त्यात नेमका काय बदल झाला आहे? रुग्णाला काय त्रास आहे? पुढे काय औषधोपचार करता येईल? ते ठरवता येईल.

हेही वाचा

Back to top button