भिडेवाडा स्मारक उभारणीत आचारसंहिता ठरणार अडचण!

भिडेवाडा स्मारक उभारणीत आचारसंहिता ठरणार अडचण!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक भिडेवाडा स्मारकाचा आराखडा अद्यापही अंतिम करण्यात आलेला नाही. स्मारक कसे असावे, यावर मंत्र्यांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. निविदा प्रक्रिया व अन्य तांत्रिक बाबी पूर्ण होऊन लोकसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी स्मारकाचे भूमिपूजन होण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे हे स्मारक आचारसंहितेत अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी शिवाजी रस्त्यावरील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्या भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक करण्याची मागणी विविध घटकांकडून अनेक वर्षे केली जात होती. वेळोवेळी राज्यातील शासनकर्त्यांनी याला मान्यताही दिली. मात्र, वाड्यातील भाडेकरूंनी न्यायालयात याचिका दाखल केल्याने अनेक वर्षे भूसंपादन रखडले होते. दोन महिन्यांपूर्वी न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निकाल देत भाडेकरूंना योग्य तो मोबदला देत भूसंपादन करण्याचे आदेश दिले.

त्यानुसार महापालिकेने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात वाड्याचा ताबा घेऊन धोकादायक वाडा पाडला आहे. नंतर महापालिकेने वास्तुविशारदांकडून स्मारकाच्या आराखड्याचे प्रस्ताव मागविले आहेत. त्यानुसार सातहून अधिक प्रस्ताव महापालिकेला प्राप्त झाले आहेत. त्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्यासमोर झाले. या वेळी समता परिषदेचे अध्यक्ष व मंत्री छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते. या ठिकाणी पुन्हा शाळा सुरू करावी, असा आग्रह भुजबळ यांनी धरला आहे. त्यानुसार आराखडे तयार करण्यात आले आहेत. परंतु, या ठिकाणी शाळा असावी की ऐतिहासिक भिडेवाड्याची रिप्लिका उभारण्यात यावी, यावरून गोंधळ सुरू असल्याने अद्याप अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.

वाड्याच्या आराखड्याबद्दल शासनस्तरावरून अंतिम निर्णय आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवावी लागणार आहे. ही निविदा आल्यानंतर प्रशासकीय मान्यता व विकसकाला वर्कऑर्डर देणे ही तांत्रिक प्रक्रिया करावी लागणार आहे. यासाठी साधारण तीन आठवड्यांहून अधिकचा कालावधी लागू शकतो. लोकसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीची आचारसंहिता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या एक-दोन दिवसांत निविदा जाहीर न झाल्यास आचारसंहितेपूर्वी भिडेवाड्याच्या भूमिपूजनाची कुदळ पडण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे भिडेवाड्याच्या राष्ट्रीय स्मारकाचे काम आचारसंहितेत अडकण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेक अडचणींचा सामना करावा लागणार

साधारण पावणेतीन गुंठे जागेमध्ये पाच मजल्यांची इमारत उभी करणे, पार्किंग, गर्दीच्या शिवाजी व लक्ष्मी रस्त्यावरील समाधान चौकालगतच ही वास्तू असल्याने बांधकामापासून वापरापर्यंत अनेक अडचणींचा प्रशासनाला सामना करावा लागणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news