पंतप्रधानांच्या हस्ते देशातील पहिल्या ‘सी सर्व्हायव्हल’ केंद्राचे गोव्यात उद्घाटन | पुढारी

पंतप्रधानांच्या हस्ते देशातील पहिल्या ‘सी सर्व्हायव्हल’ केंद्राचे गोव्यात उद्घाटन

पणजी; पुढारी वृत्तसेवा : दोनापावला येथील एनआयडब्ल्यूएस कॅम्पसमधील ‘ओएनजीसी सी सर्व्हायव्हल इको-सिस्टम सेंटर’चे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, दि. 6 रोजी केले. या केंद्रात समुद्री वातावरणाशी कसे जुळवून घ्यावे, समुद्री वातावरण बिघडल्यास बचाव कसा करायचा? याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. अशा प्रकारचे प्रशिक्षण देणारे हे देशातील पहिले प्रशिक्षण केंद्र आहे.

‘ओएनजीसी सी सर्व्हायव्हल इको-सिस्टम सेंटर’ची रचना जागतिक मानकांनुसार करण्यात आली आहे. येथे वर्षभरात 10 ते 15 हजार जवानांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यावेळी केंद्रीय मंत्री हरिदीपसिंग पुरी, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आदी उपस्थित होते. देशाला पेट्रोलियम आणि बायोगॅस क्षेत्रात आत्मनिर्भर करण्याचा केंद्र सरकारने संकल्प केला आहे. हे इंधन समुद्रातून काढावे लागते. अशा इंधन निर्मिती केंद्रांवर काम करण्यासाठी आगामी काळात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ लागणार
आहे.

समुद्रातील उद्योगांना चालना देण्यासाठी, तेथील वातावरणाशी जुळवून घेणारे मनुष्यबळ तयार करणे गरजेचे आहे. शिवाय तिथे काही आपत्ती घडल्यास त्यातून स्वतःचा आणि इतरांचा बचाव कसा करायचा, याचीही कला त्यांच्यात असणे गरजेचे आहे. सध्या अशा प्रकारचे प्रशिक्षण घेण्यासाठी भारतीय तरुणांना विदेशांत जावे लागते. पण, आता गोव्यातील या केंद्रात भारतीय तरुणांना सहज प्रशिक्षण उपलब्ध होणार आहे.

समुद्रातील आपत्कालीन स्थितीत मिळणार बचाव कार्यास मदत

या प्रशिक्षण केंद्रात एक भव्य तलाव तयार करण्यात आला आहे. यात कृत्रिम समुद्री वातावरण तयार करण्यात आले असून, यात कृत्रिम वादळे, उंच लाटा, मुसळधार पाऊस, जहाज बुडणे, असे प्रसंग उभे केले जाणार आहेत. त्यात प्रशिक्षणार्थींना सोडून समुद्रातील आपत्कालीन स्थितीत कशाप्रकारे बचाव करायचा, हे शिकवले जाणार आहे.

Back to top button