खड्ड्यांंमुळे कुदळेवाडी ते चास रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी | पुढारी

खड्ड्यांंमुळे कुदळेवाडी ते चास रस्त्याची दुरवस्था; दुरुस्तीची मागणी

पेठ : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव तालुक्यातील कुदळेवाडी ते चास रस्ता खड्ड्यांमुळे जागोजागी उखडला गेला आहे. त्यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे वाहनचालक, प्रवासी यांनी संताप व्यक्त केला आहे. तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कुदळेवाडी ग्रामस्थांनी दिला आहे. सातगाव पठार भागातील बहुतांश वाहतूक ही कुदळेवाडी मार्गे खेड तालुक्यातील मिरजेवाडी, चास या भागात आहे.

या रस्त्याने ये-जा करणार्‍या वाहनांची मोठी वर्दळ आहे. कुदळेवाडी घाट रस्त्याचीदेखील दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहे. अनेकदा घाट रस्त्यात बिबट्यांचे दर्शन होते. अशा वेळी खड्ड्यांमुळे वाहने वेगाने जाऊ शकत नसल्याने दुचाकीस्वारांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी; अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कुदळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष सोपानराव नवले, उपसरपंच सोपानराव काळे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कुदळे व बाबाजी कुदळे यांनी दिला आहे.

हेही वाचा

Back to top button