Pune : जिल्ह्यात अद्यापही 75 लाख टन ऊस गाळप बाकी | पुढारी

Pune : जिल्ह्यात अद्यापही 75 लाख टन ऊस गाळप बाकी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात चालू वर्ष 2023-24 मध्ये 151 लाख टनाइतके ऊस गाळप अपेक्षित असून सद्य:स्थितीत
76 लाख 3 हजार 580 टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे. तर 9.83 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 74 लाख 73 हजार 265 क्विंटलइतके साखरेचे उत्पादन तयार झाले आहे. अद्यापही 75 लाख टन उसाचे गाळप बाकी असल्याची सद्य:स्थिती आहे. जिल्ह्यातील 9 सहकारी आणि एकूण 14 साखर कारखान्यांकडून जोमाने ऊस गाळप सुरू आहे. या कारखान्यांची दैनिक ऊस गाळप क्षमता 1 लाख 14 हजार 500 टनाइतकी आहे. याचा विचार करता मार्च महिनाअखेर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम सुरू राहण्याची अपेक्षा असल्याची माहिती साखर आयुक्तालयातील सूत्रांनी दिली.

जिल्ह्यात बारामती अ‍ॅग्रो या खासगी कारखान्याने 2 फेब्रुवारीपर्यंत सर्वाधिक म्हणजे 14 लाख 45 हजार 394 टनाइतके ऊस गाळप पूर्ण केले आहे. तर 8.6 टक्के सरासरी उतार्‍यानुसार 12 लाख 45 हजार 360 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. त्या खालोखाल श्री सोमेश्वर सहकारी कारखान्याने 8 लाख 26 हजार 642 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तर 11.40 टक्के सर्वाधिक उतारा मिळवित या कारखान्याने 9 लाख 43 हजार 850 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे. ऊस गाळपात दि माळेगाव सहकारी तिसर्‍या स्थानावर असून या कारखान्याने 7.73 लाख टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तर 10.7 टक्के उतार्‍यानुसार 8 लाख 19 हजार 200 क्विंटलइतके साखर उत्पादन तयार केले आहे.

हेही वाचा

Back to top button