ललित कला केंद्र प्रकरण : पुरोगामी, डाव्या संघटना आक्रमक | पुढारी

ललित कला केंद्र प्रकरण : पुरोगामी, डाव्या संघटना आक्रमक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक संस्थांमध्ये सर्वांना आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आणि टीका करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. मात्र, शिक्षणसंस्थांमध्ये झुंडशाही वाढत असून विद्यार्थी, कलाकार, शिक्षक आणि लोकशाहीप्रेमी नागरिकांवर हिंदुत्ववाद्यांचे हल्ले वाढले आहेत. या झुंडशाहीवर कारवाई करून लोकशाही-नागरी अधिकारांचे रक्षण करा, अशी मागणी विविध पुरोगामी आणि डाव्या संघटनांनी सोमवारी जिल्हाधिकार्‍यांकडे केली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राचे नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने बंद पाडल्याची घटना नुकतीच घडली. तसेच फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मधील विद्यार्थ्यांना हिंदुत्ववादी गटाने मारहाण केल्याची घटनाही मध्यंतरी घडली होती. या घटनांविरोधात विविध पुरोगामी आणि डाव्या संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी आंदोलन केले.
झुंडशाहीवर कारवाई करून लोकशाही-नागरी अधिकारांचे रक्षण करा, विद्यार्थी आणि शिक्षकांवरील सर्व गुन्हे मागे घ्या तसेच हल्ले

करणार्‍या हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हे दाखल करा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष, नौजवान भारत सभा, पीयूसीएल, नव समाजवादी पर्याय, एनएपीएम, लोकशाही उत्सव समिती आदी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिक्षण संस्थांना निशाणा करून दहशतीचे वातावरण

प्रहसनात्मक नाटकाने धार्मिक भावना दुखावल्याचे निमित्त करून नाटक बंद पाडण्यात आले. विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. विद्यार्थी आणि विभागप्रमुख यांना सरकारी दबावाखाली अटक करण्यात आली. पोलिस प्रशासन हिंदुत्ववादी शक्तींना विखारी भाषणे आणि हल्ले करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देत आहे. विद्यापीठांमधील शैक्षणिक कार्यक्रम सुरक्षित राहिलेले नाहीत. शिक्षण संस्थांना निशाणा करून दहशतीचे वातावरण तयार केले जात आहे. एफटीआयआय, पुणे विद्यापीठ येथे विद्यार्थ्यांवर झालेला हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे, अशी टीका संघटनांनी केली.

हेही वाचा

Back to top button