बारामती विमानतळावर नाईट लॅण्डींग : उपमुख्यमंत्री अजित पवार  | पुढारी

बारामती विमानतळावर नाईट लॅण्डींग : उपमुख्यमंत्री अजित पवार 

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामतीसह राज्यातील पाच विमानतळांची देखभाल अनिल अंबानी यांच्या कंपनीकडून केली जाते. तेथे सध्या नाईट लॅण्डींगची सोय नाही. परंतु लवकरच या ठिकाणीही नाईट लॅण्डींगची सोय केली जाणार आहे. बारामतीसह अन्य विमानतळांचा त्यात समावेश आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, पुण्यातील विमानतळाचा विस्तार केला गेला आहे. लवकरच त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन केले जाणार आहे. बारामतीसह राज्यातील लातूर, धाराशिव, नांदेड अशा ठिकाणाची विमानतळे सध्या अनिल अंबानी यांच्याकडे देखभालीसाठी आहेत. त्यांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाही. परंतु ते देखभालीचे कामही सोडत नाहीत. आता त्या कंपनीला नोटीस दिली आहे. त्यानंतर या ठिकाणी मोठी विमाने उतरवता येतील अशी सुविधा केली जाणार आहे. बारामतीतही नाईट लॅण्डींग व्हावे, यासाठी मी आवश्यक ते प्रयत्न करत आहे, असे पवार म्हणाले.
देशात खासगी विमानांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. मोठमोठे उद्योजक व अन्य लोकांची खासगी विमाने आहेत. त्यांना विमान उतरविण्यासाठी सध्या मुंबईतील विमानतळ वापरावे लागते. यासह तेथून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय उड्डाणे मोठ्या प्रमाणावर होतात. पुणे विमानतळाचा विस्तार झाला आहे, पण ते संरक्षण विभागाच्या अखत्यारितील विमानतळ आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथील विमानतळावरील ताण कमी करणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी सध्या अंबानींकडे असलेल्या विमानतळांवरही नाईट लॅण्डींग सुरु केले जाईल. याशिवाय जिल्ह्यात पुरंदरच्या विमानतळाचा प्रश्न मार्गी लावला जाईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी एकत्र बसून लवकरात लवकर पुरंदर विमानतळाचा प्रश्न मार्गी लावू. तेथे आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्यास पुण्यासह सांगली, सातारा, कोल्हापूर, नगर, धाराशीव आदी जिल्ह्यांचा प्रश्न सुटणार असल्याचे पवार म्हणाले.

Back to top button