महामार्गांवर अद्यापही 742 ब्लॅक स्पॉट : संख्या शून्य करण्याची गरज | पुढारी

महामार्गांवर अद्यापही 742 ब्लॅक स्पॉट : संख्या शून्य करण्याची गरज

पुणे : राज्यातील महामार्गांवर 2019 ते 2021 या कालावधीत 1004 ब्लॅक स्पॉट होते. आता त्यातील 262 ब्लॅक स्पॉटची संख्या कमी करण्यात यश आले असून, राज्यभरातील महामार्गांवर अद्यापही 742 ब्लॅक स्पॉट आहेत. राज्यात वाढत्या अपघातांचे तथा दिवसेंदिवस अपघातात मृत्यूंची वाढती संख्या पाहता महामार्ग पोलिस विभागाकडून, पोलिस घटकांकडून अपघातस्थळांचे विश्लेषण करण्यात आले. त्याद्वारे ही माहिती समोर आली आहे. ब्लॅक स्पॉटची संख्या शुन्य करण्याचे उद्दिष्ट महामार्ग पोलिसांकडून बाळगण्याची गरज आहे. तरच आगामी काळातील अपघात आणि अपघाती मृत्यू रोखण्यात यश मिळणार आहे.

कुठे- किती ब्लॉक स्पॉट?

  • राष्ट्रीय महामार्ग – 511
  • राज्य महामार्ग – 147
  • मुख्य जिल्हा रस्ते किंवा
  • प्रमुख जिल्हा मार्ग – 00
  • इतर रस्ते – 79
  • एक्स्प्रेस वे – 05
  • एकूण – 742 ब्लॅक स्पॉट

अपघातांची कारणे

वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर अपघात होत असल्याचे महामार्ग पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. यात अतिवेग, विना हेल्मेट, सीट बेल्टचा वापर न करणे, लेन कटिंग, नो एन्ट्री प्रवेश, यांसारख्या अनेक कारणांमुळे मृत्यू होत असल्याचे महामार्ग पोलिसांना दिसून आलेे.

दरवर्षी सरासरी 15 हजार वाहनचालकांचा मृत्यू

राज्यात 2021 मध्ये 29 हजार 477 अपघात झाले असून, 13 हजार 528 वाहनचालकांचा अपघाती मृत्यू झाला. तसेच 2022 मध्ये 33 हजार 383 अपघात झाले असून, 15 हजार 224 वाहनचालकांचा मृत्यू झाला. दरवर्षी राज्यात सरासरी 30 हजार अपघात होत असून, दरवर्षी सरासरी 15 हजार वाहनचालकांचे मृत्यू होत आहेत.

महामार्ग पोलिसांच्या उपाययोजना

महामार्ग पोलिसांकडून एनएचएआय, पीडब्ल्यूडी, एमएसआरडीसी इत्यादी रस्ते देखभाल करणार्‍या विभागांच्या माध्यमातून महामार्गांवर रम्ब्लर्स, कॅट आईज, ब्लिंकर्स, गतिरोधक, वाहतूक नियम साईन बोर्ड, रस्त्यांचे रुंदीकरण, डिव्हाईडर यांसारख्या विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामुळे 262 ब्लॅक स्पॉट कमी करण्यात यंदा महामार्ग पोलिसांना यश आले आहे.

हेही वाचा

Back to top button