राज्यात अद्याप 239 लाख टन ऊस गाळप बाकी.. | पुढारी

राज्यात अद्याप 239 लाख टन ऊस गाळप बाकी..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यात 685 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले असून 9.62 टक्केसरासरी उतार्‍यानुसार 66 लाख टन साखरेचे उत्पादन हाती आलेले आहे. अद्यापही 239 लाख टनांइतके ऊस गाळप अपेक्षित आहे. मार्चअखेर हंगाम सुरू राहणार असून हंगामाअखेर 92 लाख टन साखर उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. सद्यःस्थितीत दोन साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून 205 कारखान्यांचा हंगाम सुरू आहे.

साखर आयुक्तालयाच्या 2 फेब्रुवारीच्या अहवालानुसार कोल्हापूर विभागात सर्वाधिक 157.29 लाख टन ऊस गाळप पूर्ण झाले आहे, तर 10.98 टक्क्यांइतका सर्वाधिक उतारा मिळवत या विभागात 172.73 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्यात कोल्हापूर विभाग ऊस गाळप, साखर उत्पादन आणि उतार्‍यात अग्रस्थानी कायम आहे. चालूवर्षीचा हंगाम 2023-24 मध्ये एकूण 14 लाख हेक्टरवर ऊस पीक उभे आहे. त्यातून गाळपासाठी एकूण 1022.73 लाख टनाइतकी ऊस उपलब्ध होईल. प्रत्यक्षात 90 टक्के ऊस गाळपास येईल, असे गृहित धरून 924 लाख टनांइतके ऊस गाळप होणे अपेक्षित आहे. हंगामाच्या सुरुवातीस इथेनॉलकरिता जाणारी साखर वगळून 89 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित धरण्यात आले होते. मात्र, उतार्‍यामध्ये होत असलेल्या चांगल्या वाढीमुळे उत्पादन 92 लाख टनांइतके होण्याची अपेक्षा आहे.

राज्यात काही भागात उशिराने ऊसतोड मजूर उपलब्ध झाल्यामुळे हंगाम उशिराने सुरू झाला. हंगामाच्या सुरुवातीस ऊस उपलब्धता पाहता तीन महिनेच हंगाम चालेल, असे चित्र होते; मात्र मार्चअखेरपर्यंत हंगाम चालेल. परतीच्या पावसामुळे ऊस उतार्‍यात वाढ होण्यास मदत झाली असून साखर उत्पादनात अपेक्षेपेक्षा थोडी वाढ होईल.

– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, साखर आयुक्त, पुणे

विभागनिहाय ऊस गाळप…

  • कोल्हापूर…………….157.29 लाख टन
  • पुणे………………….142 लाख टन
  • सोलापूर……………..149 लाख टन
  • अहमदनगर…………..87 लाख टन
  • छत्रपती संभाजीनगर…..64.58 लाख टन
  • नांदेड……………….77.19 लाख टन
  • अमरावती…………..6.4 लाख टन
  • नागपूर……………..2.18 लाख टन

हेही वाचा

Back to top button