छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून चाकूने भोसकून तरुणाची हत्या; मारेकरी पसार | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : जुन्या वादातून चाकूने भोसकून तरुणाची हत्या; मारेकरी पसार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : भावसिंगपुरा येथे जुन्या वादातून दोन मारेकऱ्यांनी तरुणाची चाकूने भोसकून हत्या केली. ४ फेब्रुवारीला संध्याकाळी साडेसात वाजता भावसिंगपुरा भागात ही खळबळजनक घटना घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत छावणी ठाण्यात नोंद करण्याची प्रक्रिया सुरु होती, अशी माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली.

शेख आमेर शेख सलीम (२८, रा. पेठेनगर, भावसिंगपुरा) असे मृताचे नाव आहे. अधिक माहितीनुसार, आमेरविरुद्ध पूर्वी खुनाचा आणि इतर काही गुन्हे दाखल असल्याचे पोलिस निरीक्षक पवार यांनी सांगितले. तो रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्याच दोन मित्रांचा त्याच्यासोबत जुना वाद होता. त्या दोन्ही मित्रांनी ४ फेब्रुवारीला संध्याकाळी आमेरला गाठले. त्याच्यासोबत जुन्या वादातून हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानंतर दोघांनीही आमेरवर चाकूने वार केले. यात तो गंभीर जखमी झाला. ही माहिती पोलिसांना मिळाल्यावर प्रभारी निरीक्षक पवार, उपनिरीक्षक गणेश केदार, प्रमोद देवकते हे पथकासह घटनास्थळी धावले. त्यांनी आमेरला घाटीत दाखल केले. तेथे उपचार सुरु असताना आमेरचा मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने डॉक्टरांनी मृतदेह शवागृहात ठेवला आहे. ५ फेब्रुवारीला उत्तरीय तपासणी केली जाईल.

संशयितांची नावे समोर आली आहेत. मात्र, ते पसार झाले आहेत. त्यांचा शोध सुरु केला आहे. जुना वाद याशिवाय आणखी काही कारण आहे का, हे आरोपींच्या अटकेनंतरच स्पष्ट होईल.
– संभाजी पवार, पोलिस निरीक्षक

मृत रेकॉर्डवरील आरोपी

मृत शेख आमेर याच्याविरुद्ध अंदाजे दोन वर्षांपूर्वी खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. त्याशिवाय, इतरही काही गुन्हे त्याच्याविरुद्ध दाखल आहेत. तो रेकाॅर्डवरील आरोपी आहे. मारेकऱ्यांचे रेकाॅर्ड आहे की नाही, हे स्पष्ट नाही, अशी माहिती संभाजी पवार यांनी दिली.

हेही वाचा

Back to top button