डिसेंबरपर्यंत 5 हजार 763 कोटींचे पीककर्ज; जिल्हाधिकार्‍यांची माहिती | पुढारी

डिसेंबरपर्यंत 5 हजार 763 कोटींचे पीककर्ज; जिल्हाधिकार्‍यांची माहिती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पीक कर्जवाटपामध्ये सलग तिसर्‍या वर्षी उच्चांक गाठत दरवर्षी नवनवे विक्रम स्थापित केले आहेत. 2023-24 मध्ये गतवर्षी 31 डिसेंबरपर्यंतच 5 हजार 763 कोटी रुपये इतके पीक कर्जवाटप झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली. खरीप आणि रब्बी हंगाम कर्जवाटपाबाबत वेळोवेळी बँकाची जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बैठक घेऊन सार्वजनिक क्षेत्रातील राष्ट्रीयीकृत बँका, खासगी क्षेत्रातील बँका तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जास्तीत जास्त पीक कर्जवाटपासाठी प्रोत्साहित केले. बँकांच्या जिल्हा समन्वयक तसेच क्षेत्रीय व्यवस्थापकांशी जिल्हाधिकार्‍यांनी स्वत: दूरध्वनी व ई-मेलद्वारे संपर्क साधत अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेतला.

तालुकापातळीवर होणार्‍या बैठका तसेच दर महिन्याला पीक कर्जवाटपाचा आढावा घेण्यात आला. त्यामुळे उद्दिष्टांपेक्षा अधिक कर्जवाटप शक्य झाले. गत आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 5 हजार 20 कोटी रुपये आणि त्यापूर्वी 2021-22 मध्ये 3 हजार 893 कोटी इतके पीक कर्जवाटप जिल्ह्यात झाले होते. तत्पूर्वी 2015-16 साली 3 हजार 506 कोटी 31 लाख रुपये कर्जवाटप करण्यात आले होते. त्यानंतर हा विक्रम थेट 2021-22 मध्ये मोडण्यात आला आणि त्यानंतर सलग तीन वर्षे नवीन विक्रम होत आहेत. यावर्षीच्या 5 हजार 500 कोटी रुपये एवढ्या उद्दिष्टापेक्षा 263 कोटी रुपये अधिक कर्जवाटप करून उद्दिष्टाच्या 105 टक्के कामगिरी केली आहे.

यामध्ये मत्स्यव्यवसायासाठी 2 कोटी 2 लाख रुपये तसेच पशुपालनासाठी 17 कोटी 76 लाख रुपये कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त कृषी मुदत कर्जवाटपामध्येही 6 हजार 6 कोटी हजार रुपये कर्जवाटप झाले असून, पीक कर्ज व कृषी मुदत कर्ज मिळून कृषी क्षेत्रासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 11 हजार 769 कोटी रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे.

नवा विक्रम ठरणार…

गेली तीन वर्षे वार्षिक पतपुरवठा आराखडा योजनेनुसार ठरविण्यात आलेले लक्ष पार करून जिल्ह्यात कर्जवाटप करण्यात आले. 2021-22 मध्ये जिल्ह्यात 83 हजार 297 कोटींचे उद्दिष्ट असताना 2 लाख 5 हजार 259 कोटी आणि 2022-23 मध्ये 1 लाख 17 हजार 716 कोटींचे उद्दिष्ट असताना 2 लाख 70 हजार 925 कोटींचे कर्जवाटप झाले. त्या तुलनेत यावर्षी डिसेंबरअखेर 2 लाख 23 हजार कोटींचे विक्रमी कर्जवाटप झाले असून, चालू आर्थिक वर्षामध्ये या वर्षाचे उद्दिष्ट 31 डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यात आलेले आहे. उर्वरित तीन महिन्यांच्या कालावधीत आणखी कर्जवाटप होणार असल्याने हादेखील नवा विक्रम ठरणार आहे, असा आशावाद जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा

Back to top button