नामांकित पहिलवान कैलास पवारचा भरदिवसा खून; हल्लेखोर पसार | पुढारी

नामांकित पहिलवान कैलास पवारचा भरदिवसा खून; हल्लेखोर पसार

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील यात्रा-उत्सवांमध्ये फड गाजवणारा नामांकित पहिलवान कैलास ऊर्फ पिंटू गुलाब पवार (वय 39, रा. निमगावसावा, ता. जुन्नर) या तरुणाचा शनिवारी (दि. 3) दुपारी मांजरवाडी येथे धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आला. त्यानंतर आरोपी फरार झाले. आरोपींना अटक करण्यासाठी नारायणगाव पोलिसांनी तातडीने कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत माहिती अशी, गजराबाई सोनबा साळुंके या महिलेचा अंत्यविधी शनिवारी सकाळी 11 वाजता मांजरवाडी येथे झाला.

अंत्यविधीसाठी कैलास पवार हे नातेवाइकांसह उपस्थित होते. अंत्यविधी झाल्यानंतर कैलास पवार व नातेवाईक असलेले संशयित तीन ते पाच आरोपी हे मांजरवाडी येथील हॉटेलमध्ये दुपारी 12 च्या सुमारास चहापाण्यासाठी थांबले होते. दरम्यान, जुन्या भांडणातून कैलास पवार व त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर कैलास पवार हे बाहेर आले. येथील रस्त्यालगत असलेल्या मंदिरासमोरील झाडाजवळ संशयित आरोपींनी कैलास पवार याची छाती, पाठ व खांद्यावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात कैलास पवार हे गंभीर जखमी झाले.

उपचारासाठी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यावेळी रुग्णालयाबाहेर मोठा जनसमुदाय जमला होता. ग्रामीण रुग्णालयात उपविभागीय पोलिस अधिकारी रवींद्र चौधर, सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी भेट देऊन जमावाला शांत केले. शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. रुग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button