पुण्यात आर्थिक वादातून ठेकेदाराचा खून; बारा तासाच्या आत आरोपी अटकेत | पुढारी

पुण्यात आर्थिक वादातून ठेकेदाराचा खून; बारा तासाच्या आत आरोपी अटकेत

पुणे, वारजे : पुढारी वृत्तसेवा

आर्थिक कारणावरून झालेल्या वादातून एकाने झोपेत असलेल्या ठेकेदाराच्या डोक्यात लोखंडी बार घालून चाकूने वार करत त्याचा खून केला. यावेळी ठेकेदाराला वाचविण्याचा प्रयत्न करणार्‍या दुसर्‍या साथीदाराला देखील लोखंडी बारने डोक्यात घाव घालून गंभीर जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. २४) पहाटेच्या वेळी न्यू अहिरेगाव गणपती माथा वारजे परिसरात घडली.

रामपुजन महेंद्र शर्मा (22, रा. बिहार) असे खून झालेल्याचे नाव असून घटनेत रामभरोस लक्ष्मीठाकूर शर्मा (21, रा. बिहार) हा गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी वारजे पोलिसांनी बारातासाच्या आत पाठलाग करून आरोपी हरीकुमार शिवनाथ शर्मा (21, रा. दरभंगा, बिहार) याला अटक केली आहे. याबाबत रामभरोस शर्मा याने दिलेल्या फिर्यादीनुसार हरीकुमार याच्या विरुद्ध खून, खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीकुमार, रामपुजन आणि रामभरोस हे तिघेही मूळचे बिहार राज्यातील दरभंगा येथील आहेत. सुतारकामासाठी ते पुण्यात आले होते. अहीरेगावमधील गणपती माथा परिसरात तिघेही एकाच रुममध्ये वास्तव्यास आहेत. दरम्यान, हरीकुमार शर्मा याने एकत्रित केलेल्या कामाच्या मोबदल्यात रामपुजन, रामभरोस यांच्याकडे हिशोबापेक्षा जास्त पैशांची मागणी केली. त्याला या दोघांनी नकार दिला. याच रागातून हरीकुमार याने मंगळवारी मध्यरात्री दोघेही झोपेत असताना ठेकेदार रामपुजन याच्या डोक्यात व्यायाम करायच्या बारने पाच ते सहा घाव घातले. तसेच चाकूने वार करून त्याचा खून केला. दरम्यान हा प्रकार सुरु असताना रामभरोस हा मध्ये आला. त्यावेळी हरीकुमार याने त्याला जबर मारहाण केली. मारहाणीत रामभरोस बेशुद्ध पडल्यानंतर हरीकुमार बाहेरून दरवाजा बंद करून पसार झाला.

दरम्यान, पहाटे शुद्धीवर आल्यानंतर रामभरोसने शेजारील मित्राला फोन करून दरवाजा उघडला. यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नरेन मुंढे हे आपल्या पथकासोबत आरोपीचा शोधासाठी रवाना झाले. आरोपीचा शोध घेत पोलिसांनी त्याला मुठा गावाजवळून ताब्यात घेतले.

ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शंकर खटके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, मनोज बागल, कर्मचारी गोविंद फड, बाळू शिरसाठ, आण्णा चाटकर, नितीन कातुर्डे, अजय कामठे, अमोल राऊत यांच्या पथकाने केली.

आठ किलोमीटर पाठलाग करून ठोकल्या बेड्या

गुन्ह्यातील आरोपी हरीकुमार बिहारचा असल्याने तो त्याच्या मूळ गावी पळून जाण्याची शक्यता होती. यासाठी पोलिसांच्या पथकाने रेल्वे स्टेशन, बस थांबे आणि बिहारकडे जाणार्‍या रस्त्यावर पथके रवाना केली. दरम्यान तांत्रिक विश्लेषनाद्वारे हरीकुमार दुचाकीवरून घटनास्थळापासून 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या लवासा रस्त्यावरील मुठा गावाजवळून जात असल्याची माहिती मिळाली. उपनिरीक्षक नरेंद्र मुंढे, कर्मचारी गोविंद फड, शिरसाठ यांच्या पथकाने आठ किलोमीटर त्याचा पाठलाग करून आरोपीला ताब्यात घेतले.

Back to top button