खंडणीखोरांचाही बंदोबस्त; गुन्हेगारांची कुंडली तयार करून होणार अ‍ॅक्शन

खंडणीखोरांचाही बंदोबस्त; गुन्हेगारांची कुंडली तयार करून होणार अ‍ॅक्शन
Published on
Updated on

पुणे : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील गुन्हेगारांच्या बंदोबस्तासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात येणार आहे. त्यांची कुंडली तयार करून कडक कारवाई केली जाईल. औद्योगिक पट्ट्यामध्ये उद्योजकांकडून खंडणी मागण्याचे प्रकार घडत आहेत. उद्योजकांनी जर पुढे येऊन तक्रारी केल्यास खंडणीखोरांवर गुन्हे दाखल करू. वाहतूक कोंडी, सायबर गुन्हेगारीच्या संदर्भातदेखील पोलिस काम करतील, असे आश्वासन नवनियुक्त पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी उद्योजकांना दिले आहे. त्यांनी औद्योगिक पट्ट्यातील टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचेही संकेत दिले आहेत.

पंकज देशमुख यांनी नुकताच पुणे ग्रामीण अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. देशमुख हे स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी पुणे शहरात पोलिस उपायुक्त म्हणूनदेखील काम केले आहे.
देशमुख म्हणाले, जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती आहेत. येथे स्क्रॅप मालासाठी अनेकदा उद्योजकांना धमकावले जाते. तसेच विविध कारणांसाठी खंडणी उकळली जात असल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकारच्या टोळ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाईचा भर देण्यात येणार आहे. शिवाय उद्योजकांनी पुढे येऊन तक्रारी दिल्यास गुन्हेही नोंदवले जातील. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने कामकाज केले जाईल.

जिल्ह्यात सध्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे हे आव्हान आहे. मात्र तरीही गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. अनेक गुन्हेगारी टोळ्या ग्रामीण भागात, शहरात आणि इतर जिल्ह्यात सक्रिय आहेत. यामुळे पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाशी समन्वय साधून त्यावर अंकुश ठेवला जाईल .

झाडाझडतीवर भर

आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कामकाज केले जात आहे. शस्त्र जमा करून घेणे, प्रतिबंधात्मक कारवाया आणि गुन्हेगारांची झाडाझडती यावर भर देण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी विशेष प्रयत्न

सायबर गुन्हेगारीचे लोण आता ग्रामीण भागापर्यंतदेखील पोहचले असून, या गुन्हेगारीचा विस्तार व्यापक आहे. नागरिक सायबर गुन्हेगारांच्या विळख्यात अडकू नयेत म्हणून जनजागृतीचे कार्यक्रम हाती घेतले जाणार आहेत. त्याच बरोबर या गुन्ह्यांचा तपास लवकर व्हावा यासाठी नव्याने काही यंत्रणा खरेदी करण्यात येणार आहे. येथे काम करणार्‍या पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच सोशल मीडियावरदेखील पोलिसांचे लक्ष असणार आहे.

वाहतूक कोंडी फोडणार

ग्रामीण भागात लोणावळा आणि भीमाशंकर तसेच लोणीकंदच्या पुढे अहमदनगर महामार्गावर वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. अनेक ठिकाणी बॉटल नेक आहे तर काही ठिकाणी हॉटेल आणि पेट्रोलपंप चालकांनी अनधिकृत पंक्चर केले आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी संबंधित असलेल्या एजन्सीशी संवाद साधण्यात येईल. तत्काळ करावयाच्या उपाययोजना तातडीने हाती घेण्यात येतील तर दीर्घकालीन उपाययोजनांसाठी संबंधित एजन्सीकडे पाठपुरावा केला जाईल, असे देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news