पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्व्हन्टस ऑफ इंडिया सोसायटीतील घटना ह्या घटनाबाह्य असल्याने धर्मादाय आयुक्तांकडे दाखल प्रकरणात झालेल्या घडामोडीचा परिणाम झाला आहे. संस्थेचे विश्वस्त आणि सचिव देशमुख यांचे पितळ उघडे होताच तत्काळ उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे बैठक बोलावण्यात आली आहे. दैनिक 'पुढारी'च्या मालिकेला हे तिसरे मोठे यश आले आहे. दैनिक 'पुढारी'च्या वृत्तमालिकेची दखल घेत धमार्र्दाय आयुक्तांनी या प्रकरणात संस्थेला कारणे दाखवा नोटीस पाठवली तसेच अलाहाबादच्या श्रम न्यायालयानेही नोटीस पाठवली.
तसेच गोखले संस्थेचे कुलगुरू डॉ. अजित रानडे यांच्या अवैध नियुक्तीबाबत दिल्लीवरून संस्थेला कारणे दाखवा नोटीस आली. या घटना या आठवडाभरात पाठोपाठ घडल्याने विश्वस्त हादरले. सचिव देशमुख यांनी अलाहाबाद येथील कर्मचारी गिरीशकुमार द्विवेदी यांना धमकीचे फोन केले. मात्र, द्विवेदी यांनी दाद दिली नाही. अखेर पुणे मुख्यालय सोडून अलाहाबादला विश्वस्तांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.
धर्मादाय आयुक्तांनी पारदर्शक पवित्रा घेतल्याने संस्थेतील घोटाळ्यांच्या चौकशीच्या कामाला गती मिळाली आहे. धर्मादाय आयुक्त हे सार्वजनिक संस्थेचे पालनकर्ता असतात. त्यामळे विश्वस्तांनी त्यांना दात व नखे नसलेला वाघ अशीच धारणा ठेवून गैरकारभार सुरूच ठेवला होता. मात्र त्यांची ही कल्पना मोडीत निघाली आहे. धर्मादाय आयुक्त यांच्या पारदर्शक प्रक्रियेने विश्वस्तांच्या धोरणला सुरूंग लावला. प्रवीणकुमार राऊत यांनी 2 फेब्रुवारी रोजी धर्मादाय आयुक्तांकडे प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यामध्ये नव्याने घेतलेले सर्व सदस्य हे कोणत्याही सामाजिक क्षेत्रातील नसून ते संस्थेच्या मालमत्ता पाहून ती हडपण्यासाठी प्रस्थापित विश्वस्तांची मुले आहेत. ज्यांना परंपरागत संस्थेच्या मालमत्तेचा, पदाचा लाभ घेता यावा यासाठी मिलिंद देशमुख आणि दामोदर साहू यांनी पी. के. द्विवेदी यांना सोबत घेऊन कोरम पूर्ण न करता ठराव पास करून ही प्रक्रिया केली आहे.
संस्थेतील ज्येष्ठ सदस्य आत्मानंद मिश्रा यांनी अध्यक्ष दामोदर साहू आणि सचिव मिलिंद देशमुख यांच्यामुळे संस्थेच्या लौकिकास काळिमा फसला जात आहे म्हणून धर्मादाय आयुक्तांकडे 41( ड) साठी प्रकरण दाखल केले होते. मात्र ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. कारण देशमुख यांच्या मुलाला आजीवन सदस्य करून घेण्यासाठी आत्मानंद मिश्रा यांना देशमुखांनी प्रवृत्त केले होते. कोरम पूर्ण नसल्याने देशमुखांनी अध्यक्ष दामोदर साहू यांच्या मुलाला आणि पी.के. द्विवेदी यांच्या नाताला आजीवन सदस्य केले. त्यासाठी उत्तराखंड येथे गुपचुप बैठक घेतली. अमरीश तिवारी यांच्या मुलाला तकलादू सदस्य करायचे म्हणून अमरीश तिवारी यांचे मत आपल्याकडे वळवले. कोरम पूर्ण केल्याचे सांगून सदस्य प्रक्रिया पूर्ण केली. उर्वरित सदस्य ह्या प्रक्रियेचा विरोध करीत होते.
धर्मादाय सहआयुक्त हे पुण्यात असल्याने इतर सदस्य देशमुखांकडून सचिव म्हणून बदल अर्ज दाखल करण्याची अपेक्षा करीत होते. मात्र देशमुख यांनी त्याच विश्वस्तांना बदल अर्जात दाखल केले नाही. त्यामुळे प्रवीणकुमार राऊत यांनी बदल अर्जावर हरकत घेतली. धर्मादाय आयुक्तांची दिशाभूल करण्याचा देशमुखांचा डाव फसला. त्यामुळे मुख्यालय सोडून पी.के. द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली अलाहाबाद येथे तत्काळ बैठक ठरवून संस्थेच्या गैरकारभावर पांघरूण घालण्यासाठी मिलिंद देशमुख यांनी गिरीशकुमार द्विवेदी या कर्मचार्याला धमकीचा फोन केला. मात्र, द्विवेदी हे त्यांच्या धमकीला घाबरले नाहीत.त्यामुळेच ही माहिती पुढे आली. सदर घटनाक्रमामुळे प्रकरणामुळे देशमुख हे चांगले हादरले आहे. त्यामुळे त्यांचे मॅनेज करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
दिवंगत सदस्य रमेशचंद्र नेवे यांच्या निधनानंतर हा भोंगळ कारभार संस्थेत सुरू झाला. संस्थेच्या कामापेक्षा स्वतःची कमाई कशी करता येईल यासाठी देशमुख यांनी बहिणीला कायदेशीर सल्लागार केले. मुलाला व्यवस्थापक केले. नंतर सदस्य करून घेण्यासाठी शिवम जगताप यालासुद्धा प्रवेश दिला. हरकत घेणार्याला भ्रमात टाकणारी खेळी देशमुख खेळत असल्याने त्यांच्यासोबत असणार्या दामोदर साहू आणि पी. के. द्विवेदी यांनी मुख्यालय सोडून उत्तराखण्ड येथे ही प्रक्रिया सुरू केली.
महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील लोकांना यांचा भोंगळ कारभार समजू नये अशी व्यवस्था देशमुख करीत आहेत. धर्मादाय आयुक्तांनी केलेल्या कारवाईच्या फटक्याने हादरले आहेत. त्यामुळे मुख्यालय सोडून पुन्हा अलाहाबाद येथे बैठक घेऊन सर्व प्रकरण कसे मॅनेज करता येईल यासाठी गिरीशकुमार द्विवेदी यांना फोन करून पोलिसात जाण्याचा सल्ला देण्यात आला.
– प्रवीणकुमार राऊत, हरकतदार.
हेही वाचा