जिल्ह्याच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी येडगे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा | पुढारी

जिल्ह्याच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी येडगे यांची डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नूतन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शुक्रवारी जिल्ह्याच्या विविध प्रश्नांवर दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर येडगे यांनी डॉ. जाधव यांची निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ‘पुढारी’ माध्यम समूहाचे चेअरमन डॉ. योगेश जाधव उपस्थित होते.

जिल्हाधिकारी येडगे यांनी डॉ. जाधव यांच्याशी करवीरनिवासिनी अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, दख्खनचा राजा जोतिबाचा आराखडा, कोल्हापूर शहरातील रस्ते, रंकाळासंवर्धन, पंचगंगा प्रदूषण नियंत्रण, राजर्षी शाहू जन्मस्थळ व शाहू मिल विकास आराखडा, विमानतळ विस्तारीकरण आदीसह जिल्ह्यातील प्रलंबित विषयांबाबत तपशीलवार चर्चा केली.

डॉ. जाधव यांनी जिल्ह्याची राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा आदी क्षेत्रांत झालेली जडणघडण, ऊस दर आंदोलन, शहरातील अन्यायी टोलविरोधी आंदोलन अशी विविध आंदोलने, तत्कालीन परिस्थिती, त्यात सामाजिक जाणिवेतून प्रशासन आणि जनता यामध्ये साधलेला समन्वय, त्यातून केलेली प्रश्नांची सोडवणूक आदींची माहिती दिली.

जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांना गती द्या, प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी राजकीय, सामाजिक स्तरांवर जे जे सहकार्य लागेल ते करू, अशी ग्वाही डॉ. जाधव यांनी दिली. जिल्ह्याच्या विकासाचे प्रकल्प हाती घ्या, अशी सूचनाही डॉ. जाधव यांनी केली. आपल्या अनुभवाचा फायदा होईल, आपले सहकार्य राहील. त्याद्वारे जिल्ह्याच्या नियोजनबद्ध विकासाचे प्रयत्न करू, असे जिल्हाधिकारी येडगे यांनी सांगितले.

यावेळी ‘पुढारी’ परिवाराच्या वतीने जिल्हाधिकारी येडगे यांचा करवीरनिवासिनी अंबाबाईची मूर्ती, शाल-श्रीफळ आणि कोल्हापुरी फेटा बांधून सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, ‘पुढारी’चे संचालक मंदार पाटील, बाळासाहेब ठमके, शंकरराव पाटील आदी उपस्थित होते.

Back to top button