टाटांच्या धरणातील एक टीएमसी पाणी मुळशीकरांना द्या | पुढारी

टाटांच्या धरणातील एक टीएमसी पाणी मुळशीकरांना द्या

पौड : पुढारी वृत्तसेवा :  गेल्या अनेक वर्षांपासून मुळशी तालुक्यातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता टाटा पॉवर कंपनीने त्यांच्या धरणातून किमान 1 टीएमसी पाणी मुळशी तालुक्यासाठी उपलब्ध करून द्यावे, हे पाणी दिले तर जवळपास 50 गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. याकरिता मुळशीतील सामाजिक कार्यकर्ते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अमित कंधारे यांनी मुंबई उच्च न्यायालयात टाटा पॉवर कंपनीच्या विरोधात 24 जानेवारी रोजी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 9 फेब—ुवारी रोजी सुनावणी होणार आहे.

बि—टिशांच्या काळात 1915- 27 दरम्यान पुणे जिल्ह्यातील मावळ-मुळशी तालुक्यात मुळशी, लोणावळा, वळवणं, शिरोटा, कुंडली आणि ठोकरवाडी, अशी सहा धरणे बांधली गेली. ही धरणे टाटा पॉवर कंपनीच्या ताब्यात असून, या धरणांमधून वीजनिर्मिती केली जाते. शतकापूर्वी टाटा पॉवर कंपनीने भिरा, भिवपुरी आणि खोपोली येथे जलविद्युत निर्मिती प्रकल्प उभे केले. यासाठी टाटा कंपनीने पश्चिम बाजूचे पाणी हे भिरा, भिवपुरी आणि खोपोली या जलविद्युत केंद्रांकडे वळविले. यासाठी अमित कंधारे यांनी अ‍ॅड. कृष्णा मोरे, अ‍ॅड. हेमंत निवंगुणे व अ‍ॅड. जाधव यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे.

50 गावांचा पाण्याचा प्रश्न सुटणार
गेल्या अनेक वर्षांपासून मावळ मुळशी तालुक्यातील लोकसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्यामुळे गंभीर बनला आहे. टाटांच्या धरणातील पाणी हे मुळशीतील 24 गावे, हिंजवडी परिसरातील 13 गावे आणि कोळवणमधील 11 गावांसाठी राखीव ठेवण्यात यावे, अशी मागणी सातत्याने संबंधित खात्यांकडे करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या जल-जीवन मिशनअंतर्गत मुळशी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या मिशनचे जिल्हाधिकारी हे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

Back to top button