

पिंपरी : मुलाला केलेल्या मारहाणीचा जाब विचारल्याने भाच्याने मामावर चाकू हल्ला चढवला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मामाचा उपाचादरम्यान मृत्यू झाला. ही घटना खेडमधील नाणेकरवाडी येथे रविवारी (दि. 28) दुपारी घडली. रमेश सुरेश भोसले (55, रा. लांडेवाडी, भोसरी) असे मृत्यू झालेल्या मामाचे नाव आहे. याप्रकरणी जखमी अवस्थेतील रमेश भोसले यांनी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार, भाचा कृष्णा गणेश भोसले (रा. लांडेवाडी) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश आणि कृष्णा हे मामा-भाचे आहेत. रमेश यांचा मुलगा आकाश याला आरोपी कृष्णाने मारहाण केली होती. या मारहाणीचा रमेश यांनी जाब विचारला असता कृष्णा याने मामा रमेश यांच्या पोटात चाकूने वार करत त्यांना गंभीर जखमी केले. रमेश यांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता त्यांचा उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. पोलिसांनी कृष्णा याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. तपास चाकण पोलिस करत आहेत.
हेही वाचा