Pune News : समाविष्ट गावांतील मिळकतधारकांना दिलासा.. | पुढारी

Pune News : समाविष्ट गावांतील मिळकतधारकांना दिलासा..

पुणे : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांतील मिळकत कराची बिले अद्याप झालेली नाहीत. त्यामुळे हे मिळकतधारक करामध्ये 40 टक्के सवलत मिळविण्यासाठी बिल मिळाल्यानंतर पीटी 3 फॉर्म भरून देऊ शकतात, असे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आज स्पष्ट केले. दरम्यान, 31 जानेवारीपर्यंत पीटी 3 फॉर्म जमा करण्याची मुदत शिथिल करण्यात आली आहे.

राज्य शासनाच्या आदेशानंतर महापालिकेने मागील वर्षी पुन्हा मिळकत करामध्ये 40 टक्के सवलत सुरू केली आहे. यासाठी महापालिकेच्या जुन्या हद्दीतील नागरिकांकडून ते स्वत: मिळकतीचा वापर करत असल्याबाबतची हमी म्हणून पीटी 3 फॉर्म भरून घेतले आहेत. जुन्या हद्दीसाठी ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत होती. तर नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांतील नागरिकांना बिले पाठविण्यास सुरुवात केली. त्यानंतर कर सवलत मिळावी यासाठी 31 जानेवारीपर्यंत पीटी 3 फॉर्म भरून देण्याची मुदत होती. ही मुदत बुधवारी संपली.

समाविष्ट 23 गावांपैकी पिसोळी, सूस, म्हाळुंगे, मांजरी आणि वाघोली या गावांतील मिळकतींची मिळकत कराची बिले अद्यापपर्यंत झालेलीच नसल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायतींच्या नोंदीवरून महापालिकेच्या नोंदी आणि नवीन मिळकत कर क्रमांक मिळू न शकल्याने या गावांतील नागरिक पीटी 3 फॉर्म भरू शकत नसल्याचे समोर आले. यासंदर्भात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे विचारणा केली असता, ते म्हणाले समाविष्ट गावांतील नागरिक मिळकत कराची बिले मिळाल्यानंतर पीटी3 फॉर्म भरून देउ शकतात. या पीटी 3 फॉर्मनुसार त्यांना मिळकत करामध्ये सवलत देण्यात येते.

हेही वाचा

Back to top button