आळंदी : नामा म्हणे आता लोपला दिनकर; बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ; 726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला वैष्णवांचा सागर

आळंदी : नामा म्हणे आता लोपला दिनकर; बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ ;  726 व्या संजीवन समाधी सोहळ्याला वैष्णवांचा सागर
Published on
Updated on

आळंदी : श्रीकांत बोरावके : 

पाहूनी समाधीचा सोहळा ।
दाटला इंद्रायणीचा गळा
बाळ सिद्ध पाहता चिमुकला । कुणी गहिवरे कुणी हळहळे ।
भाळी लावून चरण रजाला चरणावरी लोळल । चोखा गोरा आणि सावता।
निवृत्ती हा उभा एकटा । सोपानासह उभी मुक्ता अश्रूपुर लोटला
सुमारे 726 वर्षांपूर्वी ज्या विरहाने इंद्रायणी हेलावली होती, तोच सोहळा हजारो वारकरी, भाविकांनी याची देही याच डोळा अनुभवला. नामदेव महाराजांचे 16 वे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांच्या अमोघ वाणीतून समाधी सोहळ्याचे कीर्तन ऐकूण वैष्णवांचा सागर गहिवरला. भाविकांचे पाणावलेले डोळे त्याच प्रसंगाची प्रत्यक्ष अनुभुती करून देत होते.

कीर्तनात-
ब्रम्हमूर्ती संत जगी अवतरले। उद्धरावया आले दीन जनां।1
ब्रम्हादिकत्यांचे वंदिती पायवणी। नाम घेता वदनी दोष जाती।2
हो कां दुराचारी विषयी आसक्त। संत कृपे त्वरित उद्धरती।3
अखंडित नामा त्यांचा वास पाहे। निशिदिनी ध्याये सत्संगती।4

या अभंगातून माउलींच्या जीवनचरित्राची माहिती देत समाधी सोहळ्याचे वर्णन करताना अक्षरशः ज्ञानेश्वर महाराज नामदासदेखील भावनाविवश होत अश्रू ढाळत होते. बाराच्या सुमारास घंटानाद करत समाधीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. नामदेव महाराज पादुका माउलींच्या समाधीजवळ नेण्यात आल्या आणि एकच माउली नामाचा जयघोष करत भावपूर्ण वातावरणात श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा 726 वा संजीवन समाधी सोहळा मंगळवारी (दि. 22) दुपारी साडेबारा वाजता पार पडला. राज्याच्या कानाकोपर्‍यातून आलेल्या हजारो भाविकांनी याची देही याच डोळा हा सोहळा आपल्या डोळ्यांत साठवत संजीवन समाधीचे दर्शन घेतले.

तत्पूर्वी, माउलींना पवमान अभिषेक व दूधआरती घालून पहाटे तीन वाजेच्या सुमारास प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. सकाळी 10 वाजता हैबतबाबा पायरीपुढे कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात झाली. सकाळी 10 वाजता संत नामदेव महाराजांचे सोळावे वंशज ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज नामदास यांचे समाधी सोहळा वर्णनपर कीर्तन झाले. मंदिराच्या महाद्वारात हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. दुपारी पावणेबाराच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. घंटानाद, अभिषेक आणि माउलींच्या समाधीवर पुष्पवृष्टी करून आरती करण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांमार्फत माउलींच्या समाधीपुढे विराजमान करण्यात आल्या, तदनंतर मंदिराला प्रदक्षिणा मारून महाद्वारातून बाहेर पडल्या.

धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा, कृष्णपक्षी तुज निर्धारा, भेट देत जाईन, कार्तिक मास शुद्ध एकादशी, पंढरीयात्रा होईल सरिशी, दुसरी कृष्णपक्षी निर्धारिसी, तुज दिधली असे…..असे म्हणत सर्व उपस्थित संत सज्जन, वारकरी, भाविकांनी संजीवन समाधीचे दर्शन घेतले. या देदिप्यमान सोहळ्याप्रसंगी खासदार संजय जाधव, प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, अ‍ॅड. विकास ढगे पाटील, पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर, प्रमुख व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, बाळासाहेब चोपदार, मानकरी बाळासाहेब कुर्‍हाडे, योगेश आरु, स्वप्निल कुर्‍हाडे, माजी विरोधी पक्षनेते डी. डी. भोसले पाटील, ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर, रोहिदास तापकीर, मुख्याधिकारी अंकुश जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील गोडसे, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे, माजी उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, प्रशांत कुर्‍हाडे, ज्ञानेश्वर रायकर, अरुण बडगुजर, मच्छिंद्र शेंडे तसेच दिंडी प्रमुख, सेवक वर्ग व शेकडोंच्या संख्यने भाविक उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news