सर्वेक्षणाबाबत माहिती देताना कुटुंबप्रमुखांची दमछाक | पुढारी

सर्वेक्षणाबाबत माहिती देताना कुटुंबप्रमुखांची दमछाक

मंचर : पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला कुणबीमध्ये समाविष्ट करण्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालयातील शिक्षक, तलाठी, ग्रामविकास अधिकारी यांच्यामार्फत गावागावांत जाऊन कुटुंबांची माहिती मोबाईलमध्ये घेतली जात आहे. मराठा कुटुंब असणार्‍या घरांत प्रशासकीय अधिकार्‍यांकडून कुटुंबांना एकूण 183 प्रश्नांची उत्तरे द्यायची असल्याने कर्मचारी तसेच कुटुंबप्रमुखांची उत्तरे देताना दमछाक होत असल्याचे पाहावयास मिळत आहे. मराठा समाजाला कुणबीचे आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाजाच्या घरोघरी जाऊन माहिती घेतली जात असून, ग्रामीण भागात अनेक घरे मळ्यात, वाडी-वस्तीवर, रानात असल्याने अजूनही काही मराठा कुटुंबीयांच्या घरचा सर्व्हे झालेला नाही. हा सर्व्हे पुढील तीन ते चार दिवसांत पूर्ण करायचा असल्याने सर्व्हे करण्यासाठी नेमणूक केलेले शिक्षक, शासकीय कर्मचारी यांची दमछाक होत आहे.

मराठा कुटुंबात प्रशासकीय अधिकार्‍यांकडून एकूण 183 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. त्यापैकी तुमच्या घरात टीव्ही, फि—ज, गॅसकनेक्शन, लाइट आहे का? घरातील एकूण सदस्य, काम कोण करते? शिक्षण, वय, उत्पन्न, जमीन, घरात कोणी आत्महत्या केली आहे का? कुणी आंतरजातीय विवाह केला आहे का? मोटारसायकल, चारचाकी वाहन, वार्षिक उत्पन्न, महिलांना कार्यक्रमात स्थान मिळते का? महिला डोक्यावर पदर घेतात का? असे विविध 183 प्रश्न विचारले जात आहेत. सर्वेक्षणाला आलेल्या अधिकार्‍यांचा वेळ निश्चित नसल्याने घरात अनेकदा शिकलेली व्यक्ती नसल्याने असेल त्या व्यक्तीकडून माहिती मिळवली जात आहे.

अनेकदा घरात अशिक्षित आजी, आजोबा असल्याने त्यांची माहिती देताना दमछाक होत आहे. अनेक कुटुंबांतील मुलगे, मुली बाहेरगावी नोकरीनिमित्त वास्तव्यास असल्याने त्यांची अचूक माहिती मिळविण्यासाठी वारंवार फोन करून माहिती घ्यावी लागत आहे. माहिती जाणून घेऊन ती मोबाईलमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्धा तास जात आहे. दिवसभरात 15 ते 20 कुटुंबांची माहिती भरली जात असून, यात वेळ मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. सरकारने पुढील तीन ते चार दिवसांत माहिती संकलन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, एका कुटुंबास 20 ते 30 मिनिटे जात असल्याने माहिती गोळा करायला वेळ जात आहे. तसेच अनेक कुटुंबांतील सदस्य घरी नसल्याने माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवसांत सर्व माहिती जमा करणे कठीण असल्याचे सर्व्हे करणार्‍या कर्मचार्‍यांनी सांगितले.

Back to top button