बारामती शासकीय रुग्णालयात एमआरआय | पुढारी

बारामती शासकीय रुग्णालयात एमआरआय

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास सन 2023-24 या वित्तीय वर्षात राज्य योजनांतर्गत मंजूर अनुदानातून 3 टेस्ला एमआरआय ऑन टर्न की बेसिस यंत्रसामग्री व साधनसामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. सुमारे 25 कोटी 10 लाख रुपये खर्चाची ही सामग्री आहे. मेंदूसारख्या महत्त्वाच्या अवयवांच्या अतिसूक्ष्म नसांचे देखील अचूक निदान या मशिनद्वारे होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना दिलासा मिळाला आहे. एमआरआयमुळे रोगाचे अचूक निदान केले जाते. मात्र, ही तपासणी महागडी असल्याने सर्वसामान्य रुग्णांच्या खिशाला परवडणारी नाही.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय रुग्णालयात ही यंत्रणा दाखल होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे अशा प्रकारची तपासणी करण्यासाठी सर्वसामान्य रुग्णांना खर्चीक व महागड्या रुग्णालयांत जावे लागणार नाही. 3 टेस्ला एमआरआय हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे. तालुकापातळीवरील शासकीय महाविद्यालय रुग्णालयात याचा समावेश होत असल्याने रुग्णांच्या दृष्टिकोनातून ही बाब खूप महत्त्वपूर्ण आहे. या यंत्रसामग्रीची मागणी वेळोवेळी केली जात होती. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून ही बाब शक्य झाली आहे. अजित पवार यांचे विशेष कार्य अधिकारी हनुमंत पाटील, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, डॉ. राजेश उमाप, प्रशासकीय अधिकारी नंदकुमार कोकरे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.

Back to top button