

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यासह राज्यात अनेक तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचे शेतकर्यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्रीभैरवनाथ मंदिर येथे आम आदमी पक्षाच्या वतीने बेमुदत साखळी उपोषणास मंगळवारपासून (दि. 30 जानेवारी) सुरुवात करण्यात आली आहे. दुष्काळी उपायोजना प्रभावीपणे सुरू करेपर्यंत उपोषण सुरू राहील, असे आपचे राजन पवार यांनी सांगितले. दरम्यान, उपोषणाच्या दुसर्या दिवशी जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पाठिंबा दिला व मागण्या सरकारदरबारी पोहचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. आपचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय कड, अमोल कड, महेश जेधे, संदीप चौंडकर, प्रा. संतोष नवले, ह.भ.प. माणिक महाराज पवार आदी उपस्थित होते.
पुरंदरच्या अनेक गावांत जनावरांचा चारा व पाण्याचा गंभीर प्रश्न
राज्य सरकारने जाहीर केलेल्या यादीत पुरंदर तालुक्याचा गंभीर स्वरूपाच्या दुष्काळ यादीत समावेश केला आहे. मात्र, तीन महिने आधी यासंदर्भात जीआर काढूनही अद्याप कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही. सरकारने याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. तालुक्यातील अनेक गावांत जनावरांचा चारा व पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने शेतकर्यांना पशुधन सांभाळणे जिकिरीचे झाले आहे.
प्रमुख मागण्या
सरकारने दुष्काळाच्या गंभीर समस्येकडे लक्ष देत त्वरित चारा डेपो सुरू करावेत तसेच पीक कर्जावरील व्याज माफ करावे, विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करून त्यांना एसटी पास मोफत देण्यात यावे, शेती पंपाचे पूर्ण वीजबिल माफ करावे, दुष्काळाचा जीआर निघाल्यानंतर 21 दिवसापर्यंत तो लागू व्हावा, असा कायदा सरकारने करावा, या मागण्यांसाठी आम आदमी पार्टी पुरंदरने वाल्हे गावात महात्मा गांधी पुण्यतिथी दिनापासून बेमुदत साखळी उपोषण सुरू केल्याचे पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रेय कड यांनी सांगितले.