...अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार | पुढारी

...अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

मंचर : पुढारी वृत्तसेवा : तब्बल 40 वर्षांनंतर देखील डिंभे धरण (हुतात्मा बाबू गेनू जलाशय) पाणलोट क्षेत्रातील पुनर्वसनाचे प्रलंबित प्रश्न सुटलेले नाहीत. या पुनर्वसन गावांतील समस्या सुटल्या नाहीत, तर डिंभे धरणग्रस्त गावे येणार्‍या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार आहेत. निरगुडसर (ता. आंबेगाव) येथे झालेल्या मेळाव्यात बिरसा ब्रिगेड व आंबेगावातील 8 पुनर्वसन गावांनी
हा निर्णय घेतला. निरगुडसर कोलतावडे येथे राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, लायन हार्टेड होन्या भागूजी केंगले, नाग्या कातकरी, राया ठाकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त गावकरी एकत्र आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामोदर ढवळे हे होते. यावेळी ढोल-ताशाच्या गजरात, लेझिम पथक, टिपरी पथक यांच्यासह निरगुडसर गावातून आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. नर्मदा बचाव आंदोलनाच्या योगिनीताई खानविलकर, पुणे जिल्हा बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण पारधी यांनी मनोगत व्यक्त केले.

डिंभे धरण बांधून 40 वर्षे झाली. परंतु, धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अतिशय गंभीर असून, त्यांना केवळ जमिनी ताब्यात दिल्या आहेत. परंतु, पाणी व शेतात जाण्यासाठी रस्ता या मूलभूत सोयी-सुविधांपासून ते आजही वंचित आहेत. त्यामुळे या आठ पुनर्वसित गावांचे पुनर्वसन फक्त नावालाच झाले आहे. पुनर्वसन झालेले आदिवासी बांधव यांना पुनर्वसन केलेल्या ठिकाणी अनेक प्रकारच्या सुविधा देऊ, असे शासनाने सांगितले होते. पण, आतापर्यंत किती सुविधा दिल्या ते आज शासनालासुद्धा नीट सांगता येत नाही. पुनर्वसन करताना पुनर्वसन गावांमध्ये जे अंतर्गत रस्ते झाले, ते होऊन 40 वर्षे झाली; पण तेच रस्ते आजही लोक वापरत आहेत, असे बिरसा बि—गेड आंबेगाव तालुकाध्यक्ष आनंद मोहरे यांनी सांगितले.

पुनर्वसित बांधवांकडे येथील प्रशासन आणि लोकप्रतिनिधिनी लक्ष न दिल्याने 40 वर्षे उलटूनसुद्धा त्यांचे प्रश्न सुटले नाहीत. ते जर शांततेच्या मार्गाने सुटणार नसतील तर बिरसा बि—गेड पुनर्वसन गावच्या सर्व बांधवांना घेऊन कालव्यामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बिरसा बिग्रेड पुणे जिल्हाध्यक्ष प्रवीण बुधाजी पारधी यांनी दिला. कार्यक्रमाचे नियोजन जालिंदर किरवे, तुषार किरवे, विनेश भांगे, भाऊ शेळके, नवनाथ कोरके, चरण वाळकोळी यांनी केले होते. सूत्रसंचालन मच्छिंद्र लोहकरे यांनी केले. प्रास्ताविक अशोक किर्वे यांनी केले. नीलेश किर्वे यांनी आभार मानले.

Back to top button