बुलेटस्वारांना पोलिसांचा दणका ; सहा जणांवर कारवाई | पुढारी

बुलेटस्वारांना पोलिसांचा दणका ; सहा जणांवर कारवाई

सोमेश्वरनगर : पुढारी वृत्तसेवा : बुलेट गाडीला वेगळ्या आवाजाचा सायलेन्सर बसवून आवाज काढणार्‍या सोमेश्वरनगर परिसरातील सहा जणांवर वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याअंतर्गत येणार्‍या करंजेपूल पोलिस चौकीतील कर्मचार्‍यांनी कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईचे ग्रामस्थांनी स्वागत केले असून अवैध धंद्यावरही कारवाई करण्याची मागणी केली आहे. सोमेश्वरनगर येथील महाविद्यालय परिसरात बुलेट गाडीच्या सायलेन्सरमधून फटाक्यांसारखा जोरात आवाज काढून परिसरातील नागरिकांना त्रास देणार्‍या व शायनिंग मारत कानठळ्या बसवणारा आवाज काढणार्‍या सहा जणांवर करंजेपूल पोलिसांनी कारवाई करत प्रत्येकी सहा हजारांचा दंड ठोठावत गाडीला बसवलेले सायलेन्सर काढून घेतले.

सोमेश्वर परिसरात अनेक अल्पवयीन मुले दुचाकी चालवताना दिसत आहेत. वाहतुकीचे कोणतेही नियम माहिती नसताना जोरात दुचाकी चालवल्या जात आहेत. यातून अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वडगाव निंबाळकर पोलिसांनी केलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापुढेही या कारवाईत सातत्य राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग कन्हेरे, पोलिस हवालदार रमेश नागटिळक, अमोल भोसले, आबा जाधव, नितीन साळवे यांनी ही कारवाई केली.

Back to top button