Bar Association : मतदार यादीतील त्रुटींमुळे निवडणुका पुढे | पुढारी

Bar Association : मतदार यादीतील त्रुटींमुळे निवडणुका पुढे

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या निवडणुकीला काही तास उरले असताना मतदार यादीतील त्रृटींमुळे निवडणुका पुढे ढकलण्याची नामुष्की पुणे बार असोसिएशनवर आली आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यास विलंब तसेच मतदार यादीतील तब्बल 1 हजार 837 नावांवर असोसिएशनच्या माजी अध्यक्षांसह वकीलवर्गाने आक्षेप घेतल्यानंतर मतदान पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक निर्णय अधिकार्‍यांना घ्यावा लागला. मतदानाच्या आदल्या दिवशी निवडणूक पुढे ढकलण्याची घटना ही बारच्या इतिहासात पहिलीच वेळ आहे.

पुणे बारच्या वार्षिक निवडणुकीसाठी सुमारे 7 हजार 800 वकील मतदान करणार होते. मतदार यादीत बोगस अथवा पुण्याच्या बाहेरील वकिलांची नावे असल्याचा आरोप मागील काही दिवसांपासून होत होता. त्याकडे दुर्लक्ष झाल्याने मतदानाच्या आदल्या दिवशी वकीलवर्गाने 1 हजार 837 मतदारांवर आक्षेप घेण्यात आला आहे. त्याबाबतची छाननी करत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यासाठी वेळ लागणार असल्याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. नवीन धोरणानुसार 3 फेब—ुवारी रोजी मतदान यादी जाहीर करणयत येणार आहे. यावर 8 फेब—ुवारीपर्यंत आक्षेप घेता येणार आहेत. 12 फेब—ुवारी रोजी अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे. 16 फेब—ुवारी रोजी मतदान व मतमोजणी होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी अ‍ॅड. दादाभाऊ शेटे यांनी दिली.

वकिलांच्या निवडणुकांत कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष
सर्वसाधारणपणे निवडणुकांमध्ये मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होतो. मात्र, मतदानाचा दिवस येऊनही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडून अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली नाही. त्यामुळे, वकीलांच्या निवडणुकांतच कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष होत असल्याने वकील वर्गाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

मतदार यादीतील काही वकिलांचे सनद ओळखपत्रांवरील पत्ते हे पुणे शहराबाहेरचे आहे. अशा सभासदांकडे स्थानिक पुरावा मागण्यात येणार आहे. त्यानंतर मतदारांच छाननी करत अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाईल. या प्रक्रियेसाठी वेळ लागणार असल्याने निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
                                        – अ‍ॅड. केतन कोठावळे, अध्यक्ष, पुणे बार असोसिएशन

Back to top button